रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आय.एम.ए. ताप्ती व्हॅलीच्या (यावल- फैजपूर- सावदा- रावेर) नवनिर्वाचित अध्यक्षपदी डॉ. संदीप पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड दिनांक 16 मार्च 2025 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पार पडली.
सभेच्या प्रारंभी अध्यक्षपदासाठी डॉ. मिलिंद वानखेडे यांनी डॉ. संदीप पाटील यांचे नाव सुचवले. त्यास अनुमोदन डॉ. सुनील चौधरी (सावदा) आणि डॉ. प्रवीण चौधरी (रावेर) यांनी दिले. सचिवपदासाठी डॉ. सुचिता कुयटे (रावेर) आणि डॉ. उमेश पिंपळे (सावदा) यांची निवड करण्यात आली, तर त्यास अनुमोदन डॉ. दत्तप्रसाद दलाल (रावेर) आणि डॉ. व्ही. जे. वारके (सावदा) यांनी दिले. उपस्थित सदस्यांनी संमती दर्शवून हा ठराव मंजूर केला.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात डॉ. संदीप पाटील यांनी आय.एम.ए.च्या माजी पदाधिकाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि आगामी काळात संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात विशेष व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये डॉ. दत्तप्रसाद दलाल यांनी ‘इन्कम टॅक्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. याशिवाय, एम.बी.बी.एस. पूर्ण केल्याबद्दल डॉ. समृद्धी प्रवीण पाटील हिचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास यावल, रावेर, फैजपूर आणि सावदा येथील आय.एम.ए. सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.