
मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील लिपिक संवर्गावर चौथ्या वेतन आयोगापासून सुरू असलेल्या अन्यायाला अखेर वाचा फोडण्यासाठी आणि शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक विठ्ठलराव डहाळे हे १४ व १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. हे उपोषण लिपिक वर्गाच्या वेदना शासनापर्यंत पोहोचविण्याचा ठाम प्रयत्न असून, या लढ्याला संपूर्ण राज्यातील लिपिक बंधू-भगिनींचा मोठा पाठिंबा अपेक्षित आहे.
या उपोषणामागील प्रमुख मागण्या स्पष्ट असून त्यात लिपिक वर्गाच्या वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, पदनामात बदल करणे, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश आहे. विशेषतः टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होऊन तांत्रिक पद्धतीने सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक संवर्गात समाविष्ट करणे, कनिष्ठ व वरिष्ठ सहाय्यक यांचे एकत्रिकरण करून ‘सहायक प्रशासन अधिकारी’ म्हणून नवीन पदनाम देणे, तसेच वेतन श्रेणी एस-१५ लागू करणे, ही संघटनेची ठाम मागणी आहे. याशिवाय, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी यांचे एकत्रिकरण करून ‘प्रशासन अधिकारी’ हे पदनाम देण्यात यावे आणि त्यांना एस-१८ वेतनश्रेणी लागू करावी, अशीही संघटनेची भूमिका आहे.
त्याचप्रमाणे, २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘जशास तसे’ जुनी पेन्शन योजना लागू करण्याची गरज देखील संघटनेने अधोरेखित केली आहे. शासनाने याबाबत सकारात्मक पावले न उचलल्यास आंदोलने तीव्र केली जातील, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.
या उपोषणात सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व लिपिक संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कार्यालय प्रमुखाची पूर्व परवानगी घेऊन दोन दिवसांची अर्जित किंवा किरकोळ रजा घेऊन मुंबईत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



