जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘सार्वजनिक आरोग्य क्विझ – २०२५’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन आयपीएचए महाराष्ट्र आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. ११ जुलै रोजी जळगाव खुर्द येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात भरवण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील स्पर्धकांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुरस दाखवत आपली चमकदार उपस्थिती नोंदवली.
या क्विझ स्पर्धेत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (कूपर) वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई या संस्थेच्या चमूने उत्कृष्ट कामगिरी करत ‘डॉ. जल मेहता ट्रॉफी’सह प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत सामाजिक आरोग्य, महामारी व्यवस्थापन, पोषण, जल स्वच्छता, प्राथमिक आरोग्य सेवा, आणि रुग्णसंख्या नियोजन अशा महत्त्वपूर्ण विषयांवरील प्रश्नांची चाचणी घेतली गेली. पाच वेगवेगळ्या फेऱ्यांमधून पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण पाच संघांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि शारदापूजनाने झाली. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी ऑनलाईन माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या कार्याचे कौतुक करत, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा स्पर्धा आयोजित करण्यासाठी संस्थेची तयारी दर्शवली. यावेळी अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके व त्यांच्या टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
उपस्थित मान्यवरांमध्ये सचिव डॉ. वर्षा पाटील, डी.एम. कार्डिओलॉजी डॉ. वैभव पाटील, निवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, आयपीएचए ट्रेझरर डॉ. नंदकुमार साळुंखे, राज्य समन्वयक डॉ. योगिता बावस्कर आणि आयोजन प्रमुख डॉ. दिलीप ढेकळे यांचा समावेश होता.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके व डॉ. दिलीप ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण समितीने अत्यंत परिश्रमपूर्वक काम केले. क्विझमध्ये प्रश्न विचारण्याची जबाबदारी डॉ. निलेश बेंडाळे व डॉ. झशांक जोशी यांनी सांभाळली. विजय मोरे व डॉ. प्रियांका येणकुरे यांनी स्कोअरर म्हणून मोलाची भूमिका बजावली.
स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभात विजेत्या संघांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे देण्यात आली. स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सार्वजनिक आरोग्य विषयावरील जागरूकता वाढवणे, वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत करणे आणि आरोग्यविषयक धोरणांच्या अनुषंगाने भविष्यातील सक्षम नेतृत्व घडवणे हा होता.



