मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ‘आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक’ महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत.
आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे पाठविणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात. यादरम्यान त्यांचा अपघात झाल्यास त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने त्यांच्यासाठी विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन त्यांचा कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना १० लाख व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास ५ लाख रुपये विमा संरक्षण देण्याचा निर्णयास सरकारने मान्यता दिली आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना विमा संरक्षण लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित १ कोटी ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील ७४ हजार आशा सेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक यांना लाभ होणार आहे.