बेंगळुरू वृत्तसंस्था । दसरा, दिवाळीदरम्यान नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्टेट बँकेने गेल्या महिन्यात प्रक्रिया शुल्कमाफीची घोषणा केली होती. ही शुल्कमाफी ३१ डिसेंबरपर्यंतच्या नव्या कर्जांना लागू होईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र स्टेट बँकेने हा निर्णय अचानक रद्द केल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळपास सर्व प्रकारच्या कर्जांवर पुन्हा एकदा प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) आकारणी सुरू होणार आहे. गृहकर्ज, वाढीव कर्ज, कंपन्या व बांधकाम व्यावसायिकांना दिले जाणारे कर्ज आदी कर्जांसाठी हा बदल लागू करण्यात येणार आहे, असे बँकेतर्फे सांगण्यात आले. ‘आमच्या बँकेने एक जुलैपासून कर्जाचे व्याजदर हे रेपो दराशी संलग्न केले आहेत. त्यानंतर रेपो दरकपातीनंतर वेळोवेळी आम्ही कर्जांवरील व्याजदर घटवले आहेत. यामुळे पूर्वीच्या तुलनेत आमचे कर्ज स्वस्त झाले आहे,’ असे या बँकेच्या सूत्राने सांगितले.