क्रीडा संकुलनाचे रखडलेले काम सुरू करा – मनसेचे आमदारांना निवेदन

यावल प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासून येथे तालुकास्तरीय क्रीडा संकुल मंजूर असतानाही क्रीडा संकुलाचे काम रखडले असून, युवकांमध्ये तीव्र नाराजी आहे. क्रीडा संकुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतन आढाळकर यांच्या नेतृत्वाखाली रावेर-यावल तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल येथे मागील गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण पातळीवरील खेळाडुंसाठी तालुका क्रीडा संकुल मंजूर झालेले असून त्यासाठीचा शासनाकडील तीन कोटी 65 लाख रुपयांचा निधीही मंजूर असल्याचे मनसेने निवेदनात नमूद केले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झालेले असतांना यावल तालुक्याचे काम मात्र अद्यापही सुरू झालेले नाही, क्रीडा संकुलासाठी लागणारी जागा तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील व स्वर्गीय आमदार हरिभाऊ जावळे यांनी पाहणी करून निश्चित केली होती.

राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडापटू तयार व्हावेत, त्यसाठी उच्च दर्जाचे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्रिस्तरीय क्रीडा संकुलाची उभारणी करण्याचे धोरण राज्य सरकारचे आहे. यामागे ग्रामीण भागातील होतकरू मुलांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याची संधी प्राप्त व्हावी.

मात्र येथील तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचे काम मार्गी लागत नसल्याने आपण त्या बाबतीत पाठपुरावा करून लवकरात लवकर तालुका क्रीडा संकुलाचे काम मार्गी लावावे निवेदनावर जिल्हाध्यक्ष जनहित चेतन अढळकर, तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, शहर उपाध्यक्ष आबीद कच्छी, विद्यार्थी सेनेचे गौरव कोळी,अनिल सपकाळे यांच्या स्वाक्षरी आहेत.

 

 

Protected Content