बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ

बोदवड प्रतिनिधी | येथील नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास प्रारंभ झाला असून येथे यंदा मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

बोदवड येथील नगरपंचायतीची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी दिनांक १ पासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास प्रारंभ झाला असून याची शेवटची मुदत ७ डिसेंबर आहे. दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी व अवैध नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी ८ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक १३ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय तहसील कार्यालयात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने कामकाज पहात आहेत. तर तहसीलदार जितेंद्र कुवर व मुख्याधिकारी आकाश डोईफोडे हे सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत.

बोदवड येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जोरदार टक्कर होण्याची शक्यता असून यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content