सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याचे स्टँडअप परफॉर्मन्स आणि विनोदी पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका प्रकाराने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोलापूर येथे झालेल्या एका शो नंतर प्रणितवर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

प्रणित मोरेचा शो २ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता 24K क्राफ्ट ब्रूझ, सोलापूर येथे पार पडला. शो संपल्यानंतर तो चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर आला. त्याच वेळी ११ ते १२ जणांचा एक गट त्याच्याकडे आला, पण हे लोक फोटोसाठी नव्हते, तर त्यांनी थेट प्रणितवर हल्ला केला. जमावाने त्याला मारहाण करत धमकी दिली. या प्रकरणात तन्वीर शेख हा प्रमुख असल्याचे सांगितले जात आहे.
प्रणित मोरेने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, त्याने स्टँडअप दरम्यान बॉलीवूडमधील नवोदित अभिनेता वीर पहारिया याच्यावर विनोद केला होता. यामुळेच त्या जमावाने त्याच्यावर हल्ला केला. मारहाण करताना त्याला धमकी देण्यात आली की, “अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा.” याशिवाय भविष्यात असे विनोद केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही धमकावण्यात आले.
या संपूर्ण प्रकारात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे 24K क्राफ्ट ब्रूझ येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. या घटनेचा महत्त्वपूर्ण पुरावा असलेल्या सीसीटीव्ही फुटेजबाबत संबंधित ठिकाणी वारंवार विनंती करूनही फुटेज देण्यास नकार दिला जात आहे. तसेच, पोलिसांशी संपर्क साधूनही अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप प्रणितच्या टीमने केला आहे.
या हल्ल्यानंतर वीर पहारियानेही आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्याने हिंसेचा मार्ग चुकीचा असल्याचे सांगितले असून, कलाकारांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळायला हवे, असे मत मांडले आहे. ही घटना कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न आहे का? याबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या हल्ल्याचा निषेध केला आहे, तर काहींनी प्रणितने सार्वजनिकरित्या माफी मागावी अशी मागणी केली आहे.