एसटी महामंडळ करणार कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती

मुंबई प्रतिनिधी | कर्मचार्‍यांच्या संपाबाबत तोडगा न निघाल्याने एसटी महामंडळाने आता कंत्राटी कामगारांची भरती करण्यासाठी सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त झालेल्यांना पुन्हा सेवेत रूजू करण्याची तयारी सुरू केली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, मागील अडीच महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप अद्यापही सुरू असून आता  महामंडळाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना साद घातली आहे. महामंडळाने त्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार वय ६२ वर्ष पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. करार पद्धतीवर नेमणूक होणार्‍या चालकांना दरमहा २६ हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

इच्छुक चालक ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले, त्या विभागांमध्ये करारपद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करू शकणार आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये अर्ज करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. इच्छुक उमेदवारावर एसटी महामंडळाच्या सेवेत असताना अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघाताची नोंद नसणे, शिक्षा म्हणून बडतर्फ किंवा सेवामुक्त केलेला नसावा अशी अटही महामंडळाने ठेवली आहे.

यासोबत महामंडळाने इतरही कंत्राटी चालकांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मनुष्यबळ उपलब्ध करून देणार्‍या संस्थेकडून करार पद्धतीने चालक भरती करून घेण्यासाठीचे अर्ज मागितले आहेत. या कंत्राटी चालकाकडे अवजड वाहन चालवण्याचा किमान एक वर्षाचा अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याशिवाय संबंधित उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना व पीएसव्ही बॅच असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे चालकांची नियुक्ती करून देणार्‍या संस्थांनी महामंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे ५५ हजार संपकरी कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आतापर्यंत एसटी महामंडळातील तब्बल ११४४ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. तर ११ हजार २४ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Protected Content