सूरत-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३२ आमदार फोडले असून सोबत ३ अपक्षांनाही घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मविआमधील तब्बल पाच मंत्र्यांनाही त्यांनी सोबत घेतले आहे. शिंदे आणि अन्य ३५ असे आमदार पहाटे आसामला पोहचले आहेत.
मध्यरात्रीनंतर एकनाथ शिंदे हे आपल्या सहकार्यांसह सूरत विमानतळावरून आसामला पोहचले. त्यांच्यासाठी स्वतंत्र विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी शिंदे हे पहिल्यांदा कॅमेर्यासमोर आलेत. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेच्या विचारांशी प्रतारणा करणार नसल्याचे सांगितले. हिंदुत्व हाच आमचा श्वास असून आम्ही यापासून दूर जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्यासह इतर ३५ अशा एकूण ३६ आमदारांचा समावेश होता. यात बच्चू कडू, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार अशा एकूण पाच ( ते स्वत: धरून ६ !) मंत्र्यांना फोडले. विशेष बाब म्हणजे यात राज्याच्या सर्व भागांमधील आमदारांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री उशीरा हे सर्व जण आसामला पोहचले. यातच रात्री स्वतंत्र गटाची नोंदणी देखील केली असून यात शिवसेनेचे ३३, प्रहार जनशक्तीचे दोन तर एक अपक्ष आमदारांचा समावेश आहे. आज दिवसभरात प्रचंड मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.