मुंबई/जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्पात पंचसूत्री मांडली असून यातून खर्या अर्थाने प्रगतीला चालना मिळणार आहे. हा अर्थसंकल्प प्रगतीला चालना देणारा आणि सर्व क्षेत्रांना समान न्याय देणारा म्हणजेच सर्वसमावेश असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या खात्याला गेल्या वेळेस पेक्षा ५०० कोटी रूपयांनी जास्त म्हणजेच ३ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून या माध्यमातून आजवर केलेल्या कामांना गती देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी करत या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. २४ हजार ३५३ कोटी रूपयांची महसुली तुट असणार्या या अर्थसंकल्पाचे ना. गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, यंदाचा अर्थसंकल्प हा कोरोनानंतरच्या प्रगतीला वेगवान चालना देणारा ठरणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ना. अजितदादा पवार यांनी विकासाची मांडलेली पंचसूत्री ही अतिशय महत्वाची असून या माध्यमातून सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. यात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग आदींचा पंचसूत्रीत समावेश असून यातून संतुलीत विकास साधला जाणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, उद्योग आदींसह सर्व क्षेत्रांना समान निधी प्रदान करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने नियमीत कर्ज अदा करणार्या राज्यातील २० लाख शेतकर्यांसाठी प्रत्येकी ५० हजार इतकी प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. भूविकास बँकेचे ९६४ कोटी १५ लाख रूपयांचे कर्ज माफ करण्यात आल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. पीक विमा योजनेसाठी सरकार पर्यायी विचार करत असल्याची बाब देखील अतिशय महत्वाची आहे. यासोबत महिला शेतकर्यांच्या अनुदानात वाढ, शेततळ्यांच्या अनुदानातील वाढ, कृषी विद्यापीठांना वाढीव अनुदान, बाजार समित्यांचे बळकटीकरण या बाबी स्वागतार्ह असल्याचे ना. पाटील यांनी नमूद केले.
ना. गुलाबराव पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, यंदा आरोग्य सुविधांसाठी देखील वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यात जळगाव येथे नवजात शिशू आणि महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पीटलला मंजुरी मिळाल्याची बाब लक्षणीय आहे. सीएनजीवरील जीएसटी कपात करण्यात आल्यामुळे याचे मूल्य कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात पाणी पुरवठा खात्याला तीन हजार कोटी रूपयांचा निधी मिळणार असल्याचे ना. अजितदादा पवार यांनी जाहीर केले आहे. गेल्या वर्षी २ हजार पाचशे ३३ कोटी रूपयांवरून यात तब्बल पाचशे कोटी रूपयांची वाढ करण्यात आली असून याच्या माध्यमातून राज्यातील जनतेला त्यांच्या घरापर्यत शुध्द पाणी पोहचवण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले आहे.