जिल्हा कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

जळगाव प्रतिनिधी । सचित्र छायाचित्रांसह जिल्ह्याच्या सर्वांगीण माहितीचा समावेश असलेल्या जळगाव जिल्हा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स व्यवसाय मंत्री महादेव जानकर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव तथा जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते. जळगाव जिल्हा कॉफी टेबल बुकमध्ये जिल्ह्याची सर्वांगीण माहिती देणारे विविध आठ विभाग असून यामध्ये १७० विषयांची हाय रिझोल्युशनची रंगीत छायाचित्रे आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे.

वर्षभराचे परिश्रम

कॉफी टेबल बुकच्या कव्हरपेजवर कटआऊटसह अक्षरांच्या उठावाने लक्षवेधून घेणार्‍या या १८० पानी कॉफी टेबल बूकमधील आशय आणि छायाचित्रांची मांडणी ही सर्वांग सुंदर प्रकाशन या विशेषणाला परिपूर्ण ठरणारी आहे. या कॉफी टेबल बुकची संकल्पना ही माजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची होती. त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती आधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या संपादकीय मंडळाने जवळपास वर्षभर परिश्रम घेऊन माहिती व छायाचित्रांचे संकलन, संपादन केले आहे.

ड्रोनने छायाचित्रण

जळगाव जिल्ह्याचे सरकारी गॅझिटीयर यापूर्वी तीनवेळा (प्रथम आवृत्ती इंग्रजी १८८०, द्वितीय आवृत्ती इंग्रजी १९६२ आणि तिसरी आवृत्ती मराठी १९९४) प्रकाशित झाले आहे. यानंतर प्रथमच जळगाव जिल्ह्याची अद्ययावत माहिती व भरपूर रंगीत छायाचित्रे असलेले हे कॉफी टेबल बुक (आवृत्ती २०१९) तयार झाले आहे. यातील बहुतांश छायाचित्रे ही ड्रोनचा वापर करुन काढली असून ती आर्ट पेपरवर प्रसिद्ध करताना हाय रिझोल्युशनच्या कलर सेपरेशनचा वापर केला आहे.

सुलभ वर्गीकरण

या कॉफी टेबल बुकमध्ये जिल्ह्याच्या माहितीचे आठ विभाग आहेत. पहिल्या विभागात जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती आहे. यात जळगाव शहर, जिल्हा व ऐतिहासिक स्थळांची माहिती आहे. दुसरा विभाग धार्मिक, ऐतिहासिक स्मारके व पर्यटनस्थळे यांची माहिती देणारा आहे. यात लेण्या, किल्ले, मंदिरे, उत्खनन झालेली गावे आदींची माहिती आहे. तिसर्‍या विभागात नद्या, धरणे व उद्यानांची माहिती असून चौथ्या विभागात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह खासगी संस्था तथा व्यक्तिंनी जपलेल्या संग्रहालयांची माहिती आहे. पाचव्या विभागात जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्प व दळणवळणाची माहिती असून सहावा विभाग प्रशासन व शिक्षण विषयक सुविधांची माहिती देतो. सातव्या विभागात जिल्ह्यातील यात्रा, उत्सव व संस्कृतीची तपशिलवार माहिती असून आठव्या विभागात जिल्ह्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे तथा संस्थांची माहिती देणारा आहे. यात ज्येष्ठ समाजसेवी साहित्यिक, लेखक, कवी, शाहिर यांच्यासह जिल्ह्यातील पद्मश्रींचा परिचय देण्यात आला आहे.

क्युआर कोडचा वापर

या कॉफी टेबल बूकमधील छायाचित्रांवर क्युआर कोड दिला असून ते मोबाईलमध्ये स्कॅन केल्यास वेबसाईटवरील माहिती व फोटो इंटरनेटद्वारे सहज उपलब्ध होतात. ही तांत्रिक बाब मीडिया आर & डी (इं) प्रायव्हेट लिमीटेड, मुंबई यांनी सांभाळली आहे. या कॉफी टेबल बुकची संगणकीय मांडणी व छपाई मीडिया रिसर्च ण्ड डेव्हलपमेंट (इं) प्रायव्हेट लिमीटेड कंपनी (मुंबई) ने केली आहे.

संपादक मंडळ

या कॉफी टेबल बूकसाठी संपादक मंडळात तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह सर्वश्री. भुजंगराव बोबडे, कार्यकारी अधिकारी, गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे संचालक डॉ. एस. टी. इंगळे, जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी तथा धरणगाव महाविद्यालयाचे प्राध्यापक वा. ना. आंधळे, फैजपूर येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. एम. के. जाधव, ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, राजेश यावलकर, छायाचित्रकार तुषार मानकर (रावेर), सुमीत देशमुख (जळगाव) यांचा समावेश आहे.

याचबरोबर तालुकास्तरावरुन माहिती देणारे विविध दैनिकांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आदींनीही कॉफी टेबल बूकमधील आशय नेटका, नेमका संकलन व संपादन करण्यास सहाय्य केले आहे. कॉफी टेबल बूकमध्ये सर्वांच्या सहकार्याचा उल्लेख आहे. या कॉफी टेबल बूकसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच ते पूर्णत्वास जावू शकले.

मान्यवरांच्या शुभेच्छा

जिल्ह्याच्या सर्वांगीण माहितीचे प्रथमच तयार झालेल्या या कॉफी टेबलबूकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे शुभेच्छा संदेशही आहेत.

हे कॉफी टेबल बूक जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे खाजगी प्रकाशन असून जिल्ह्याच्या प्रचार व प्रसारासाठी हे कॉफी टेबलबुक जिल्ह्यातील मान्यवर व्यक्ती, संस्था व प्रसार माध्यमांना वितरित केले जाणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content