नवी दिल्ली । कोरोनाच्या आपत्तीला आळा घालण्यासाठी भारताने लसीच्या निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी अनोख्या पध्दतीत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
जगभरात कोरोनाच्या लसींचे उत्पादन होत असले तरी भारताच्या लसीची उपयुक्तता ही अधिक प्रमाणात आढळून आल्याने जगभरात मेड इन इंडिया लसीला मागणी वाढली आहे.
भारतानं ब्राझीलसाठीही लसी पाठवल्या आहेत. यानंतर ब्राझीलचेराष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी भारताचे आभार मानले आहेत. कोरोना लसींची खेप ब्राझीलला पोहोचल्यानंतर बोलसोनारो यांनी आनंद व्यक्त केला. भारतानं ब्राझीलला तब्बल २० लाख डोस पाठवले आहेत. बोलसोनारो यांनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचं छायाचित्र शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. “जागतिक समस्येला दूर करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये सामील एक मोठा सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. ब्राझीलला कोरोना प्रतिबंधात्मक लसींची निर्यात करण्यसाठी धन्यवाद,” असं ट्वीट ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांनी केलं आहे. तसंच त्यांनी हिंदीमध्येदेखील धन्यवाद लिहीत भारताचे आभार मानले आहेत.