गुणवान डॉक्टरांची पिढी घडविण्यासाठी प्राध्यापकांनी अपडेट राहणे गरजेचे – डॉ. रामानंद

जळगाव प्रतिनिधी । रुग्णांना अत्यावश्यक व अद्ययावत उपचार मिळण्यासाठी तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले ज्ञानवंत, गुणवान करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी अपडेट राहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशिक्षण तितकीच महत्वाची भूमिका पार पाडते. यामुळे प्राध्यापकांनी उत्साहाने प्रशिक्षणात सहभाग घ्यावा असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे तीन दिवसीय बेसिक कोर्स कार्यशाळा व नैतिकता व संवाद प्रशिक्षण  घेण्यात येत आहे. त्याचे उदघाटन सोमवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० रोजी उदघाटन करण्यात आले. यावेळी उदघाटक म्हणून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद बोलत होते. यावेळी मंचावर कार्यशाळेचे निरीक्षक वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, नाशिकचे   डॉ.राकेश पाटील, उप अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, वैद्यकीय शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. किशोर इंगोले उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. इंगोले यांनी कार्यशाळा व प्रशिक्षण  घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर मान्यवरांनी दीप प्रज्वलन करीत कार्यशाळेचे उदघाटन केले. 

यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, प्राध्यापकांना प्रशिक्षण मिळणे हि काळाची गरज आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी स्वतः ला अपडेट ठेवणे गरजेचे आहे. आज नवनवीन आजार येत आहे. तसेच काही आजारांमध्ये बदलदेखील होत आहेत. त्याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. प्राध्यापकांनी प्रशिक्षणात सहभाग घेऊन ज्ञानार्जन करून घेतले तर डॉक्टरांची  भावी पिढी पोषक तयार होईल. आपल्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना सेवा देताना रुग्णांशी आपुलकी निर्माण होत आहे, हि आनंदाची बाब आहे, असेही ते म्हणाले.

सूत्रसंचालन डॉ. योगिता सुलक्षणे यांनी तर आभार डॉ. योगिता बावसकर यांनी मानले.  कार्यशाळेत दिवसभरात डॉ. किशोर इंगोले यांनी स्वतःची ओळख, बदललेले नवीन उपक्रम याविषयी मार्गदर्शन केले. तर डॉ. विजय गायकवाड यांनी प्रौढ शिक्षणाचे उद्दिष्टे, डॉ. इम्रान तेली यांनी मुलांना शिकवायची अध्ययन पद्धती तर डॉ. योगिता बावस्कर यांनी मुलांना शिकवताना करावयाची मूल्यमापन पद्धती तर डॉ. संदीप पटेल यांनी नवीन अध्ययन कार्यपद्धतीत विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.

 

Protected Content