वन्य प्राण्यांची शिकार रोखण्यासाठी विशेष पथक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल पूर्व वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

नुकतीच सातपुडयातील वनक्षेत्रात वन विभागाने केलेल्या धडक कार्यवाहीत यावल पूर्व वनपरिक्षेत्रात एका व्यक्तीला भेकरचे मांस शिजवताना अटक करण्यात आली होती. त्यासोबतच या भागात शिकार आणि अन्य गुन्हे करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी यावल पूर्व वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.

त्यासोबतच सातपुडा पर्वताच्या वनक्षेत्रात गुन्हेगार शोधण्यासाठी ड्रोनचा वापर,वणवा पेटविणे व आदी गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी प्रसंगी उपग्रहाची मदत,वणवा लावणाऱ्यांना पकडण्यासाठी राज्य राखीव दलाच्या जवानांचे पथक तैनात करण्यात आले आहेत. वनविभागाचे फिरते पथक,पोलिस तसेच गुप्त वार्ता विभाग यांचीही मदत घेण्यात येणार आहे. जंगलात जागोजागी गुप्त कॅमेरा, सीसीटीव्ही लावेले असून नाकाबंदी करण्यात आली आहे. ही कार्यवाही यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनअधिकारी राजेंद्र सदगिर, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फंटागरे करीत आहे.

Protected Content