


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेअंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रतिमहिना रु. ५,०००/- मानधन देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार सदर योजना राबविण्यात येत असून दि. १ जुलै २०२६ ते दि. ३१ जुलै २०२६ या कालावधीत पात्र लाभार्थींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनेसाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक असून दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. अर्जदाराने कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाचे योगदान दिलेले असणे आवश्यक आहे. वयाने ज्येष्ठ, विधवा, परित्यक्ता व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
अर्जदाराच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी वार्षिक उत्पन्न रु. ६० हजारांपेक्षा जास्त नसावे. तसेच अर्जदाराची उपजीविका केवळ कलेवर अवलंबून असावी किंवा सध्या अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसावे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेत नसलेले तसेच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले कलाकार व साहित्यिक पात्र राहतील.
अर्जासोबत वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचा संयुक्त फोटो, बँक पासबुक, अपंगत्व दाखला (लागू असल्यास), कार्यक्रमांचे छायाचित्र, राज्य अथवा केंद्र शासन पुरस्कार प्रमाणपत्र, नामांकित संस्था अथवा व्यक्ती शिफारसपत्र तसेच विविध पुरावे (कार्यक्रमाबाबत फोटो) इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक पात्र लाभार्थींनी महा-ई सेवा केंद्र अथवा आपले सरकार केंद्रामार्फत User ID तयार करून अर्ज सादर करावा. तसेच स्मार्टफोनच्या माध्यमातून आपले सरकार पोर्टलवरूनही अर्ज करता येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भा. शि. अकलाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.



