Home Cities मुक्ताईनगर गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेत जे. ई. स्कूलला विशेष पुरस्कार

गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेत जे. ई. स्कूलला विशेष पुरस्कार

0
6


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा २०२५-२६’ मध्ये मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वच्छता, प्लास्टिक व ई-कचरा व्यवस्थापन तसेच डिजिटल जनजागृतीच्या क्षेत्रात शाळेने केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या वतीने समन्वयक शिवाजीराव वंजारी यांनी पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून अप्पासाहेब पटवर्धन सफाई व पर्यावरण तंत्र निकेतन, देहू, पुणेच्या संचालिका डॉ. शिल्पा नारायणन उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन होते. जळगाव मनपा आयुक्त आदित्य जीवने, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विश्वस्त ज्योती जैन आणि डॉ. गीता धरमपाल यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शिल्पा नारायणन यांनी सत्य, अहिंसा, धर्म, प्रेम आणि शांती ही मूल्ये केवळ भाषणांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज व्यक्त केली. निसर्गाप्रती संवेदनशीलता म्हणजे अहिंसा, कर्तव्यातून दिसणारा धर्म, अपेक्षेविना केलेले कार्य म्हणजे प्रेम आणि या सर्व मूल्यांचा संगम म्हणजे शांती, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वच्छतेबाबत बोलताना डॉ. नारायणन यांनी कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. कचरा जाळल्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. विशेषतः प्लास्टिक कचरा जाळल्याने घातक वायू निर्माण होतात, तर जैविक कचऱ्यापासून नैसर्गिक खत तयार करता येते. त्यामुळे कचरा वर्गीकरण आणि योग्य व्यवस्थापनाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल युगात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देतानाच शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वच्छतेबाबतही योग्य जाणीव निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय मनोगतात अशोक जैन यांनी आपण जन्माला आलो त्यापेक्षा पृथ्वीवरून निरोप घेताना जग अधिक सुंदर कसे राहील, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या ‘डिजिटल कचऱ्या’पासून दूर राहण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता आणि वाहतूक नियमांची जाणीव प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात विशेष तरतूद असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवादातून भविष्यातील पिढी घडत असल्याने शिक्षकांची जबाबदारी मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव मनपा आयुक्त आदित्य जीवने यांनी स्वच्छ शाळा स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करताना प्रत्येक गावातील शाळा ही तेथील ऊर्जेचे केंद्र असून देशाचे भविष्य घडविण्याचे काम तेथून होत असल्याचे सांगितले. गांधी रिसर्च फाऊंडेशनची स्वच्छ शाळा स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून विचार, संस्कार आणि देश घडविणारी प्रयोगशाळा असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजातील संस्कृती आणि जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमधील ८० तालुक्यांतील शाळांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. यंदा स्पर्धेच्या मूल्यांकनात प्लास्टिक कचरा, ई-कचरा व्यवस्थापन आणि डिजिटल जनजागृती या विषयांना विशेष महत्त्व देण्यात आले होते. सहभागी शाळांपैकी १७ जिल्ह्यांतील ४३ शाळांची अंतिम मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीतील या सर्व शाळांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. जे. ई. स्कूल मुक्ताईनगरच्या वतीने समन्वयक शिवाजीराव वंजारी यांनी मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्कार स्वीकारला. यावेळी स्पर्धेत सहभागी शाळांनी राबविलेल्या विविध स्वच्छता व पर्यावरणपूरक उपक्रमांचे व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले. शिवाजीराव वंजारी यांनी आपल्या मनोगतात गांधीतीर्थ स्वच्छ शाळा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक आणि आमूलाग्र बदलांचा विशेष उल्लेख केला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून गिरीश कुळकर्णी यांनी स्पर्धेची भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. स्वच्छतेची संकल्पना केवळ शाळेच्या परिसरापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ती घर, परिसर आणि संपूर्ण समाजापर्यंत पोहोचावी, तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण व्हावी, हा स्पर्धेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात प्रशांत सूर्यवंशी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन सादर केले. चंद्रशेखर पाटील यांनी आभार मानले, तर गिरीश कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


Protected Content

Play sound