मराठा आरक्षणासाठी सोलापूर बंद; समाजबांधव आक्रमक

 

सोलापूर, वृत्तसंस्था । मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी काल राज्यभर निषेध केल्यानंतर आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.

आज सोलापूर जिल्ह्यात बंद पाळण्यात येत असून सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातली आंदोलनाची पहिली ठिणगी माढ्यात पडली आहे. माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद असणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलिस दलाने जिल्हाभरात कडक पोलिस बंदोबस्त लावला आहे.

दरम्यान, माढ्यातील तरुणांनी भल्या पहाटेच एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी माढा शहर दणाणून सोडलं आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाज आंदोलन करणार आहे. कोल्हापुरातही आज पुन्हा मराठा समाजाचे आंदोलन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Protected Content