


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात गेल्या आठवडाभरापासून रखडलेले कचरा संकलन अखेर पुन्हा सुरू झाले आहे. वारंवार तोंडी तक्रारी करूनही कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर सोशल मीडियावरून आपली समस्या मांडली. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर पोस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या दीड तासात संबंधित भागात घंटागाडी दाखल झाल्याने काँग्रेसचे नेते एडवोकेट चेतन झनके यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मुक्ताईनगर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नियमित कचरा संकलन महत्त्वाचे असताना संबंधित परिसरात जवळपास आठवडाभर घंटागाडी फिरकली नव्हती. त्यामुळे नागरिकांकडे घरगुती कचरा साचत होता. परिणामी परिसरातील नागरिकांची गैरसोय वाढली होती. याबाबत नागरिकांकडून वारंवार तोंडी स्वरूपात समस्या मांडण्यात आली होती. मात्र, अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. परिसरातील कचरा संकलनाची समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पोस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या दीड तासात कचरा संकलन करणारी घंटागाडी परिसरात पोहोचली आणि रखडलेले कचरा संकलन पुन्हा सुरू करण्यात आले. समस्येची दखल घेत सेवा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. विशेष म्हणजे, घंटागाडी घेऊन आलेल्या चालकाचे नागरिकांनी अनोख्या पद्धतीने स्वागत केले. नागरिकांच्या वतीने चालकाला हार, रुमाल, टोपी आणि नारळ देऊन त्याचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर घंटागाडी आल्याने आणि परिसरातील कचरा संकलन सुरू झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
दरम्यान, केवळ एक दिवस घंटागाडी येऊन प्रश्न सुटणार नसून यापुढे ही सेवा नियमितपणे सुरू राहावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. घंटागाडीने ठरलेल्या वेळेत संबंधित भागात येऊन दररोज अथवा नियोजित वेळापत्रकानुसार कचरा संकलित करावा, जेणेकरून पुन्हा कचरा साचण्याची वेळ येणार नाही, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात आली. स्वच्छ आणि सुंदर मुक्ताईनगर घडविण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांसोबत नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. शहरातील समस्या वेळोवेळी प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या निराकरणासाठी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. समस्या मांडत राहू आणि त्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्नही सुरू ठेवू, असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.



