Home Cities जळगाव जळगाव महापालिकेत पाच अधिकाऱ्यांची खांदेपालट; प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी आयुक्तांचा आदेश

जळगाव महापालिकेत पाच अधिकाऱ्यांची खांदेपालट; प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी आयुक्तांचा आदेश

0
3


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।जळगावशहर महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासाठी पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांनी याबाबत आदेश काढला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नवीन जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विविध विभाग, प्रकल्प आणि प्रभागांच्या कामकाजाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आल्याने महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेत खांदेपालट झाली आहे.

महापालिकेच्या आदेशानुसार कनिष्ठ अभियंता योगेश वाणी यांच्याकडे परिवहन विभाग प्रमुख पदासह स्वच्छ भारत अभियान प्रकल्प (एसबीएम-२) आणि अमृत-२ अंतर्गत मलनिस्सारण योजनेच्या प्रकल्प अभियंत्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विभागांतील कामकाजाच्या देखरेखीची जबाबदारी आता त्यांच्याकडे राहणार आहे.

कनिष्ठ अभियंता विशाल सुर्वे यांच्या कामकाजातही बदल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील प्रकल्प अभियंता पदाची जबाबदारी बदलून त्यांच्याकडे पुन्हा अमृत-२ अंतर्गत मलनिस्सारण योजनेचे काम सोपविण्यात आले आहे. या प्रकल्पाशी संबंधित कामांना गती देण्याच्या दृष्टीने हा बदल करण्यात आल्याचे आदेशातून स्पष्ट होते.

रचना सहाय्यक घुणेश्वर साळुंखे यांच्याकडे अमृत १.० आणि २.० पाणीपुरवठा योजनेचे प्रकल्प अभियंता म्हणून कामकाज कायम ठेवण्यात आले आहे. यासोबतच पाणीपुरवठा विभागातील उपअभियंत्यांचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांशी संबंधित कामकाजाचे समन्वय आणि देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

कनिष्ठ अभियंता विजय मराठे यांच्याकडे नगररचना विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रभाग क्रमांक १६, १७, १८ आणि १९ मधील कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित प्रभागांतील विकासकामे, बांधकामाशी संबंधित बाबी आणि विभागीय कामकाजाच्या देखरेखीचे काम ते पाहणार आहेत.

तर कनिष्ठ अभियंता मनोज वन्नेरे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रभाग क्रमांक ६, १०, ११ आणि १५ तसेच प्रभाग समिती क्रमांक ३ चे प्रभाग अधिकारी पद सोपविण्यात आले आहे. त्यामुळे या प्रभागांमधील सार्वजनिक बांधकामाशी संबंधित कामांसोबत प्रशासकीय जबाबदारीही त्यांच्यावर राहणार आहे.

महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या नवीन जबाबदाऱ्या तात्काळ स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील नसत्या नियंत्रण अधिकाऱ्यामार्फत सक्षम प्राधिकाऱ्यांकडे कार्यभार स्वीकारल्याचा अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेतील विविध विकासकामे, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छता, नगररचना आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांना अधिक प्रभावीपणे गती देण्यासाठी करण्यात आलेल्या या फेरबदलाकडे प्रशासनातील महत्त्वाची खांदेपालट म्हणून पाहिले जात आहे.


Protected Content

Play sound