मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यशवंत जाधव यांच्या डायरीची चौकशी होत असेल तर बिर्ला-सहारा डायरीचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. २०१३ साली गाजलेल्या या डायरीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख होता.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. यातील एका डायरीा उल्लेख खूप गाजत आहे. या अनुषंगाने यशवंत जाधवांच्या डायरी सोबत बिर्ला-सहारा डायरीचीही चौकशी आयकर विभागानं करावी अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
आयकर विभागाने सलग चार दिवस जाधवांच्या घरात छापेमारी केली. यावेळी काही महत्वाचे दस्तऐवज देखील हाती लागले. चौकशीदरम्यान जाधवांची डायरी आयकर विभागाच्या हाती लागली. त्यामध्ये जाधव यांनी दोन कोटी रुपये ’मातोश्री’ला दिल्याचा उल्लेख आहे. ’मातोश्री’ कोण? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्वत:च्या आईलाच आपण पैसे दिल्याचं सांगितलं. दानधर्म करण्यासाठी आईला हे पैसे दिल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
दरम्यान, ऑक्टोबर २०१३ मध्ये इन्कम टॅक्स आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणांनी आदित्य बिर्ला समूहाच्या कॉर्पोरेट कार्यालयांवर छापे टाकले होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये सहारा इंडिया समूहाच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले होते. सहारा पेपर्स हे मुळात मंत्री आणि न्यायाधीशांसह भारतातील सत्ता वर्तुळातील काही व्यक्तींना दिलेल्या लाचेच्या तपशीलांची कागदपत्रं आहेत. या कागदपत्रांमधील काही नोंदींनुसार, ’गुजरात-मुख्यमंत्री’ यांना पैसे देण्यात आल्याचा आरोप आहे. एका एन्ट्रीमध्ये ’गुजरात सीएम- २५ कोटी असं म्हटलं आहे. तेव्हा गुजरातचे हे मुख्यमंत्री सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. पण, बिर्ला समूहाचे कार्यकारी अध्यक्ष शुभेंदू अमिताभ यांनी चौकशी दरम्यान सांगितलं होतं की ’गुजरात सीएम’ म्हणजे गुजरात अल्कली आणि रसायनं. यामुळे या डायरीची नव्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.