झोपेत असताना पिता-पुत्रास सर्पदंश

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील शास्त्री नगर येथील एका कुटुंबातील बाप लेकास सापाने दंश केला. या घटनेत एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला असून, वडिलांची प्रकृती गंभीर आहे. दक्षित सुमित नेलावार असे मृत बालकाचे नाव आहे, तर सुमित नेलावार यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे.

वणी येथे शहरातील शास्त्री नगर परिसरातील वास्तव्यात असलेले नेलावार कुटुंबीय बुधवारी रात्री गाढ झोपेत होते. वडील सुमित नेलावार, मुलगा दक्षित नेलावार यांच्यासह सुमितची पत्नी व मुलगी हे घरात झोपून होते. दरम्यान वडील सुमित आणि दक्षितच्या अंथरुणात विषारी साप शिरला व या विषारी सापाने दोघांना चावा घेतला.

वेदना असह्य झाल्याने चिमुरडा दक्षित रडू लागला. यामुळे संपूर्ण परिवाराला जागा झाला. यावेळी घरात विषारी साप आढळला. त्यामुळे या दोघांनाही सर्पदंश झाल्याचे लक्षात आले. दरम्यान दोघांनाही तत्काळ वणीतील रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने तेथून दोघांनाही चंद्रपुर येथे उपचारासाठी रवाना केले. दरम्यान प्रवासाताच चिमुरड्या दक्षितचे निधन झाले. त्याचे वडील सुमित नेलावार यांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांचा चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिमुकल्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर घरात लपून बसलेल्या या सापाला सर्पमित्रांनी पकडले.

Protected Content