जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपतर्फे मिळालेली उमेदवारी अचानकपणे रद्द होवून दुसऱ्या व्यक्तीस दिली गेल्यामुळे आ. स्मिताताई वाघ व भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी आज सकाळी त्यांच्या घराजवळ एकत्र येऊन तीव्र नाराजी जाहीर केली.
यावेळी आ. वाघ यांनी आपण मतदार संघात प्रचाराची जय्यत तयारी केली होती, कार्यकर्त्यांच्या टीम प्रचाराला लागल्या होत्या. पक्षाने आधी उमेदवारी जाहीर केली नंतर अचानक काहीही कारण नसताना काढून घेतली, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही आपल्या नाराजीच्या भावना उघडपणे जाहीर केल्या. काही जणांनी तर पक्षाने या निर्णयाबद्दल खुलासा द्यावा, असा पवित्रा घेतला. एकूणच उमेदवारी रद्द झाल्याने उदय वाघ व आ. स्मिता वाघ यांचे समर्थक प्रचंड नाराज आले असून ते आता पुढे काय भूमिका घेतात या बाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोही उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघातील उमेदवारीबाबत सगळ्याच पक्षांमध्ये सातत्याने नाट्यमय घडामोड घडत असल्याने सामान्य जनतेत एकाचवेळी उत्सुकता आणि नाराजीची भावना आहे.