अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा येथील ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून भोईवाडा वस्तीत अजूनही काँक्रीटीकरण रस्ते झाले नसल्याने येथे ग्रामपंचायतीचे कायमच दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तालुक्यातील पातोंडा येथील ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ग्राम पंचायत इमारतींच्या पाठीमागे असलेला भोईवाडा व जुनी ग्राम पंचायत इमारतीच्या मागील भोई वस्तीत अजूनही काँक्रीटीकरण रस्ते नसल्याने सदरील वस्त्यांमध्ये रहिवासी असणाऱ्या ग्रामस्थांना चिखलात पाय तुडवावे लागत असून ग्राम पंचायतीच्या स्थापनेपासून कायमच भोई समाजाच्या वस्त्यांमध्ये दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप रहिवाशांमधून होत आहे.
गावात जवळपास ९० टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण झालेले असून काही भागांत तर दोनवेळा काँक्रीटीकरण झाले आहे. असे असून देखील ग्रामपंचायतीकडून अद्यापही दोन्ही भोई वस्त्यामधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण हेतुपुरस्पर करण्यात आलेले नाही. ग्राम पंचायतीच्या मागील भोईवस्तीत पावसाळ्यात रहिवाशांना चिखलात मार्ग काढावा लागत असतो. गटारींचे पाणी वस्त्यात शिरते, गटारींचे पाणी टाकलेल्या ढाप्यावरून वाहत असून दूषित पाण्याचे डबके तयार होतात व रहिवाशांना येण्या-जाण्यास रस्ता नसतो. गटारीसुद्धा आजपर्यंत बांधल्या गेल्या नाही आहेत. गल्लीत काही रहिवाशांनी किरकोळ अतिक्रमणे केलेली असून गल्ली अरुंद झालेली आहे.
या परिसरात वरिष्ठ नागरिक आणि लहान बालकांची संख्या जास्त असून पावसाच्या चिखलाने त्यांच्या पडण्याची भीती नाकारता येत नाही. मागील पंचवार्षिक काळात दोन्ही भोई वस्त्यात काँक्रीटीकरण करण्याचे प्रस्तावित केले होते; पण काम न झाल्याने भोईवस्त्या वंचितच राहिल्या.
दरवेळी फक्त निवडणूकीपुरता आश्वासने देऊन भोई समाजाच्या मतांचा लाभ घेऊन नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. ग्राम पंचायतीकडून हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते की काय ? म्हणून आजपर्यंत दोन्ही भोईवस्त्यामधील रस्ते विना काँक्रीटीकरणाचे आहे. जर येत्या काळात भोई वस्त्यांमधील दोन्ही रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले नाही; तर ग्राम पंचायतमध्ये येऊन ठाण मांडू. असा पवित्रा येथील रहिवाशांनी घेतला आहे.