Home उद्योग शेतकऱ्यांनी दर्जा आणि तंत्रज्ञानावर भर दिल्यास केळी निर्यातीत लक्षणीय वाढ शक्य ...

शेतकऱ्यांनी दर्जा आणि तंत्रज्ञानावर भर दिल्यास केळी निर्यातीत लक्षणीय वाढ शक्य – डॉ. के. बी. पाटील


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कृषिधन 2026 कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी केळी परिसंवादात आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केळी निर्यातीच्या संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर सविस्तर प्रकाश टाकला. जागतिक बाजारपेठेतील बदलते प्रवाह लक्षात घेता भारतीय केळीला मोठी संधी असून शेतकऱ्यांनी दर्जा आणि तंत्रज्ञानावर भर दिल्यास निर्यातीत लक्षणीय वाढ होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. पाटील यांनी सांगितले की मागील वर्षी भारतातून सुमारे ४१०० कोटी रुपयांची केळी निर्यात झाली असून ती सर्व फळांमध्ये सर्वाधिक आहे. चालू वर्षात भारताने जागतिक केळी निर्यातीतील किमान पाच टक्के वाटा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगाला कोणत्या दर्जाची केळी अपेक्षित आहे, याचा अभ्यास शेतकऱ्यांनी केल्यास निर्यातक्षम उत्पादन वाढवणे शक्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जगभरात करपा आणि पनामा या रोगांमुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने भारतीय केळीला उत्तम बाजारपेठ मिळण्याची शक्यता वाढली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी घडांची योग्य पॅकिंग, साठवण आणि वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जळगाव जिल्ह्यातील केळी देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणावर विकली जात असली तरी निर्यातक्षम केळी उत्पादन वाढवण्यासाठी गुणवत्तेवर भर देणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले.

केळी ही सफरचंदापेक्षा पाचपट पौष्टिक असून सध्या देशातील प्रति व्यक्ती केळी सेवन सुमारे ६० ग्रॅम आहे. ते १०० ग्रॅमपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले तर दरवर्षी सुमारे ६० लाख टन केळीची गरज भासेल. आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित लागवड पद्धती आणि शास्त्रीय व्यवस्थापनाच्या माध्यमातून उत्तम दर्जाची केळी उत्पादित करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

दुपारी दोन वाजता कृषी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात अध्यक्षीय स्थान शिरीषदादा चौधरी यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. के. बी. पाटील, डॉ. श्रीकृष्ण सोनोने (केव्हीके प्रमुख, जालना), युवानेते धनंजय चौधरी, डॉ. विलास जाधव (केव्हीके प्रमुख, जळगाव जामोद) यांच्यासह विविध तालुक्यांतील कृषी अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या वेळी चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यांतील शेतकरी पुरुष, शेतकरी महिला, शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी तसेच कृषी अधिकारी व कर्मचारी अशा एकूण ४० जणांचा शेतकरी सन्मान करण्यात आला. स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन हा सन्मान करण्यात आला. त्यानंतर गोकुळ पाटील, कलाबाई रायपुरे आणि स्मृती बागुल यांनी मनोगत व्यक्त करत हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण सोनवणे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती विकासाचा मार्ग मांडला, तर युवानेते धनंजय चौधरी यांनी आधुनिक शेती ही काळाची गरज असल्याचे सांगत शेतकरी स्वावलंबी होऊ शकतो, असे नमूद केले. स्टॉल धारक तुषार महाजन यांनी प्रदर्शनाचा अनुभव सांगत लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.

प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नैसर्गिक टाकाऊ वस्तूंपासून रांगोळी साकार करणारे कलाकार राजू साळी यांचा सन्मान माननीय शिरीषदादांच्या हस्ते करण्यात आला. सर्व स्टॉल धारकांनाही सन्मानचिन्ह देऊन प्रोत्साहन देण्यात आले. अध्यक्षीय भाषणात शिरीषदादांनी हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आणि शासनाच्या मदतीसोबतच शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतल्यास परिसराचा सर्वांगीण विकास होईल, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश महाजन यांनी केले तर आभार डॉ. धीरज नेते यांनी मानले. डी. एन. कॉलेज व फार्मसी कॉलेज, फैजपूर यांच्या सहकार्याने तसेच सातपुडा विकास मंडळाचे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि मधुस्नेह परिवार यांच्या अथक प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.


Protected Content

Play sound