चैतन्यदायी वातावरणात निघाला श्री राम रथोत्सव ! ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी | श्रीराम मंदिर संस्थानतर्फे काढण्यात येणारा आणि तब्बल १४९ वर्षांची परंपरा असणारा श्रीराम रथोत्सव आज विधीवत पूजन करून काढण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करत सायंकाळी साडेपाच पर्यंत रथयात्रा पूर्ण करण्यात येणार आहे. भाविकांच्या उदंड उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात रथोत्सवास प्रारंभ झालेला आहे.

कोरोनाच्या आपत्तीमुळे गेल्या वर्षी रथोत्सवात खंड पडला होता. तेव्हा रथ फक्त प्रतिकात्मक पध्दतीत १० मीटरपर्यंत फिरवण्यात आला होता. यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने काही अटींच्या आधारे रथोत्सवाला परवानगी दिली आहे. या अनुषंगाने आज पहाटेपासून राम मंदिर संस्थान परिसरात चैतन्यदायी वातावरण दिसून आले.

 

आज पहाटे चार वाजता श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते काकड आरती व महापूजा करण्यात आली. यानंतर भजन व पूजा झाल्यानंतर देव रथावर नेण्यात आले. यानंतर त्यानंतर आरती व पूजा करण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, गादीपती हभप मंगेश महाराज, आ. राजूमामा भोळे, आ. चंदूलाल पटेल, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू महाजन, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, डॉ. केतकी पाटील, माजी महापौर भारती सोनवणे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, माजी उपमहापौर सुनील खडके आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन केल्यानंतर सुमारे पावणेबाराच्या सुमारास रथ आपल्या नियोजीत मार्गावरून ओढण्यास प्रारंभ झाला.

 

यंदा देखील श्रीराम मंदिर, भोईटे गढी, कोल्हेवाडा, आंबेडकरनगर, चौधरीवाडा, तेली चौक, राम मारुती पेठ, श्रीराम मंदिर मागील गल्ली, रथ चौक, श्री भैरवनाथ मंदिर, बोहरा बाजार, सुभाष चौक, दाणाबाजार, पीपल्स बँक मार्गे शिवाजी रस्ता, घाणेकर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौक, श्री भवानी मंदिर, अंबुरावजी कासार, मरिमाता मंदिर, श्री लालशा बाबा समाधी भिलपुरा, बालाजी मंदिर मार्गे रथ चौकात रथ येऊन प्रभू रामरायांची उत्सवमूर्ती पालखीत विराजित होऊन श्रीराम मंदिरात रामनामघोषात आणून विराजित केली जाणार आहे. दरम्यान, रथोत्सवाच्या मार्गात विठ्ठलपेठेत सुभाष खडके यांच्याकडे पानसुपारी कार्यक्रम, गांधी मार्केट परिसरात आरती, भवानी माता मंदिरात अमित शर्मा यांच्याकडून पानसुपारी, भिलपुरा चौकात लालशा बाबा दर्गा येथे सेवेकरी चादर चढवतील. त्यानंतर बालाजी मंदिर व दक्षिणमुखी मारुती मंदिरात आरती होणार आहे.

Protected Content