धक्कादायक : ‘त्या’ ‘कलेक्टर’ पोलीसांपैकी अनेकांची डिव्हिजन बाहेर बदलीच नाही !

8e4e641d e457 4a72 a50e 566006b95e01

जळगाव (प्रतिनिधी) मागील आठवड्यात हप्ते वसुलीचा संशय असलेल्या जिल्ह्यातील ७२ पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस अधीक्षकांनी मुख्यालयात जमा केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. परंतू यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी एका डिव्हिजनमध्ये १२ वर्षापेक्षा अधिकचा कार्यकाळ घालवूनही त्यांची बदली डिव्हिजन बाहेर झालीच नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एकाच डिव्हिजनमध्ये अनेक वर्ष राहिल्यामुळेच हे कर्मचारी गब्बर बनल्याचे बोलले जात आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, २० जुलै रोजी हप्ते वसुलीचा संशय असलेल्या जिल्ह्यातील ७२ पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस अधिक्षकांनी मुख्यालयात जमा केले होते. हे कर्मचारी ‘कलेक्शन’चे काम करत असल्याची पोलीस दलात चर्चा होती. यामुळे वादग्रस्त पार्श्‍वभूमी असणार्‍या कर्मचार्‍यांना मुख्यालयात जमा करून पोलीस अधिक्षकांनी धडाकेबाज कामगिरी केली होती. परंतू या ७२ कर्मचारीपैकी साधारण २५ ते ३० कर्मचारी यांची मोठी राजकीय सेटिंग असल्यामूळे त्यांनी १२ वर्षापेक्षा अधिकचा कार्यकाळ एकाच डिव्हीजनमध्ये घालवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी याबाबत माहिती घेतल्यास सर्व गोष्टी उघड होतील, अशी दबक्या आवाजात पोलीस मुख्यालयात चर्चा आहे.

काय आहे नियम ?

 

पोलीस दलाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याला कार्यरत असलेल्या डिव्हिजनमध्ये जास्तीत जास्त १२ वर्ष सेवा बजावता येते. १२ वर्षानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना डिव्हिजन बाहेर बदली होणे गरजेचे असते. परंतू जळगाव जिल्हा पोलीस दलात अनेक कर्मचारी असे आहेत, ज्यांनी २० ते २५ वर्षापेक्षा अधिकचा कार्यकाळ एकाच डिव्हिजनमध्ये घालवला आहे. खास करून जळगाव डिव्हिजनमध्ये जास्तीचा काळ घालविणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, साईड ब्रांच करून काही जण या नियमातून पद्धतशीरपणे वाट काढतात.

 

अनेकांची मूळ नियुक्ती कुठं?, हेच कळायला मार्ग नाही !

 

मुख्यालय जमा झालेल्या ७२ कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांची मूळ नियुक्तीचे ठिकाण भलतेच पोलीस स्टेशन असून ते कार्यरत मात्र, भलत्याच पोलीस स्थानकात असल्याची देखील चर्चा आहे. बदली झाल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक कर्मचारी ‘शाळा’ भरवून मूळ ठिकाण सोडत नाहीत. तर काही जण सोयीच्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे अनेकांची मूळ नियुक्ती कुठं? हेच कळायला मार्ग नसतो.

 

म्हणून बनले ‘ते’ कर्मचारी गब्बर !

 

एकाच पोलीस स्थानकात किंवा डिव्हिजनमध्ये जास्त कार्यकाळ घालविल्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे अनेक राजकीय किंवा अवैध धंद्यावाल्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत. या संबंधातूनच या कर्मचाऱ्यांना सर्व खाचे-खोचे माहित आहेत. कोण कुठे काय धंदा व कामं करतो? याची सर्व माहिती त्यांना आहे. यातून दरमहा मोठी आर्थिक उलढाल होत होती. पर्यायी हे कर्मचारी गब्बर बनले. ‘कलेक्शन’ची मुळ म्हणजे समस्या एकाच पोलीस स्थानकात किंवा डिव्हिजनमध्ये जास्त वर्ष घालविण्यातूनच निर्माण होते.

 

आमच्यावरच अन्याय का?

 

अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना दर पाच वर्षांनी नवीन पोलीस स्थानकात बदली ठिकाणी हजर व्हावे लागते. तर काही कर्मचारी मात्र, आपल्या राजकीय सेटिंगच्या जोरावर ८ ते ९ वर्ष एकाच ठिकाणी घालवतात. आम्हालाही परिवार असतो, आमच्या मुलांची देखील शाळा असते, मग आमच्यावरच अन्याय का? आम्हाला एका पोलीस स्थानकात ५ वर्ष आणि डिव्हिजनमध्ये १२ वर्षापेक्षा अधिकचा कार्यकाळ का मिळत नाही? असा संताप देखील अनेक कर्मचारी व्यक्त करतात.

Protected Content