पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे ब्लॅकमेलिंग, अश्लील स्वरूपाचे AI-निर्मित फोटो तयार करून धमकी देणे, खंडणीची मागणी करणे, महिलेचा विनयभंग व लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न तसेच तिच्या मुलीचा पाठलाग करून तिलाही धमकावल्याच्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी निखिल अरुण चौधरी, पवन युवराज भोई आणि विजय सुभाष वाणी हे तिच्या पतीचे अनेक वर्षांपासून मित्र असून त्यांचे कुटुंबाच्या घरी येणे-जाणे होते. आरोपींनी फिर्यादीच्या पतीची जळगाव येथील एका महिलेशी ओळख करून दिली. त्यानंतर संबंधित महिलेसोबतचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ तयार करून ते दाखवत पतीला ब्लॅकमेल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या फोटो-व्हिडिओच्या आधारे आरोपींनी फिर्यादीच्या पतीकडून १५ मे रोजी ५० हजार रुपये आणि १९ जुलै रोजी एक लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय आणखी दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, असे तक्रारीत नमूद आहे. पैसे न दिल्यास फोटो व व्हिडिओ गावात तसेच सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या मुलीचे जुने फोटो वापरून AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अश्लील स्वरूपाचे फोटो तयार केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे फोटो एकमेकांना पाठवून नंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मुलीला पाठवण्यात आले. तसेच सोशल मीडिया अकाउंट तयार करून हे फोटो विविध ग्रुपमध्ये प्रसारित करण्याची धमकी देत मुलीकडे पैशांची तसेच लैंगिक स्वरूपाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय मुलीचा पाठलाग करणे, तिच्यावर अश्लील शेरेबाजी करणे आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देणे, असे प्रकार आरोपींकडून होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकरणात केवळ आर्थिक ब्लॅकमेलिंगच नव्हे, तर डिजिटल माध्यमांचा गैरवापर करून धमकी दिल्याचे आरोपही समोर आले आहेत.
दरम्यान, २९ जुलै रोजी दुपारी सुमारे एक वाजता तिन्ही आरोपी मोटारसायकलवरून फिर्यादीच्या बहादरपूर येथील घरासमोर आले आणि घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यावेळी आरोपींनी पतीचे फोटो-व्हिडिओ तसेच मुलीचे कथित अश्लील फोटो दाखवून फिर्यादीकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिलेने विरोध केल्यानंतर एका आरोपीने तिला पकडून किस केले व तिच्या शरीराला अश्लील पद्धतीने स्पर्श केल्याचा, तर दुसऱ्या आरोपीने मागून अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपींनी रात्री पुन्हा येण्याची धमकी देत, मागणी मान्य न केल्यास फिर्यादी, तिची मुलगी आणि पतीची बदनामी करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
.फिर्यादीचा पती घरी आल्यानंतर आरोपींनी त्यालाही धमकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर महिलेने पतीला घडलेला प्रकार सांगितला. तसेच तिच्या मुलीकडूनही आरोपींकडून पाठलाग व त्रास दिला जात असल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार संदिप सातपुते यांनी केली. पोलिसांकडून प्रकरणातील विविध आरोपांची चौकशी सुरू असून, तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे.



