मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एका तरुणाची कुत्रा चावल्याने मृत्यू झाला आहे. कल्याण येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाने वेळेत उपचार न घेतल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.
शुभम मनोज चौधरी (वय २७) असे कुत्रा चावल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुभमला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होत. दरम्यान, त्याला मांजर देखील चावल्याची माहिती आहे. यात त्याला जखम झाली होती. यावर उपचार न घेता शुभमने या कडे दुर्लक्ष केले. मात्र त्याला काही दिवसांपासून त्रास सुरू झाला. यामुले त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.
शुभम हा कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क इमारतीत राहतो. शुभमचे वडील हे घाटकोपर येथील एका खासगी मेडिकल दुकानात कामाला आहे. तर शुभम याने त्याचे शिक्षण पूर्ण केले असून तो नोकरीच्या शोधात होता. दोन महिन्यापूर्वी शुभम हा रात्री फिरत होता. यावेळी एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करत शुभमच्या पायाला चावा घेतला. यात त्याला किरकोळ जखम झाली. मात्र, त्याने या कडे दुर्लक्ष केलं. गेल्या आठवड्यात त्याला मांजरीने देखील चावा घेतला. याकडे देखील त्याने दुर्लक्ष केलं. मात्र, १० डिसेंबरला त्याची तब्येत खराब झाली. त्याला त्याच्या घरच्यांनी कल्याणमधील दोन खासगी दवाखान्यात भरती केले. मात्र, उपचारादरम्यान, त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा १२ डिसेंबरला सकाळी मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेप्रकरणी शुभमच्या वडिलांनी पालिकेवर गंभीर आरोप केले आहे. भटक्या कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली. कुत्र्यांच्या हल्ल्यात माझा एकुलता एक मुलाचा मृत्यू झाला. या ला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पालिकेला नव्हती. या प्रकरणाची चौकशी करून माहिती घेणार असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील श्वानाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या १२ वर्षांत पशूगणना झाली नसल्याने श्वानांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०२४ मध्ये कल्याण महानगर पालिकेच्या हद्दीत १८८०० नागरिकांना श्वानांनी चावा घेतला होता. श्वानाच्या निर्बिजीकरण व लशीकरणावर पालिकेचा लाखो रुपयांचा खर्च होत असताना या घटना वाढल्या आहेत.