चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वाघळी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून तिच्या सामानासह भाड्याने लावेलल्या चारचाकी वाहन पेटवून देवून सुमारे ४ लाख १५ हजारांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना बुधवारी १ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २ मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मध्यप्रदेशातील पानसीमल येथील रहिवाशी असलेल्या आशाबी सादीक खाटीक वय ४२ या महिला चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावात भाड्याच्या खोलीत हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांचे गावातील भास्कर हाडपे यांच्यासोबत जुने भांडण झाले होते. दरम्यान, भाड्याच्या खोलीत राहत असतांना त्यांनी रूम बदलविले होते. त्यासाठी महिलेने घरातील सामान घेवून जाण्यासाठी भाड्याने चारचाकी वाहन लावले होते. बुधवारी १ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वाहनात सामान टाकले होते. त्याचवेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे भास्कर हाडपे उर्फ राजू आप्पा, कृष्णा दिपक हाडपे, गणेश हाडपे, प्रविण उर्फ आण्णा धनगर, मुकेश रविंद्र हाडपे, तुषार भगत, दिपक भास्कर हाडपे आणि उमेश युवराज हाडपे सर्व रा. वाघळी ता. चाळीसगाव यांनी महिलेला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच एकाने घरातील सामानांवर आणि भाड्याने आणलेली वाहनावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यामुळे महिलेचे १५ हजारांचे सामान आणि ४ लाख रूपये किंमतीचे चारचाकी वाहन असे एकुण ४ लाख १५ हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी २ मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहे.