सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. मलकापूरात काँग्रेसला खिंडार पडले असून कराड दक्षिणेत भाजपला पुन्हा बळ मिळाले आहे. मलकापूरचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली पाटील, नगरसेविका स्वाती तुपे व माजी नगरसेविका अनिता राजेंद्र यादव यांच्यासह मलकापूरातील शेकडो काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. अतुलबाबा भोसले यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना कराड दक्षिणेतून 616 चे लीड मिळवून देत, कराड दक्षिणमध्ये भाजपची ताकत दाखवून दिली होती.
काँग्रेसच्या नामुष्कीजनक कामगिरीमुळे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला. त्यातच आता त्यांचे मलकापुरातील महत्वाचे शिलेदार बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांनी आपल्या समर्थक नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे कराड दक्षिणेत काँग्रेसला खिंडार पडले असून पृथ्वीराज चव्हाण व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.