मनोज जरांगे यांना धक्का; अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांचा उपोषणाला विरोध

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अवघ्या देशाची नजर लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच ४ जून रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ४ जूनपासूनच पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. देशभरात निकालाची धामधूम सुरु असतानाच उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, आतापर्यंत त्यांच्या आंदोलनाला कायम पाठिंबा देत आलेल्या अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांनीच या उपोषणाला विरोध दर्शवला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. तसे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सोपवले आहे. त्यामुळे हा मनोज जरांगेंसाठी मोठा धक्का आहे.

गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ‘गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने प्रशासनाने या उपोषणास परवानगी देऊ नये’, अशी मागणी केली आहे. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर ७० गावकऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे, जरांगे यांचं उपोषण वादात सापडल्याचं दिसून येत आहे.

ज्या गावातून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला, ज्या गावातून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला, ज्या गावकऱ्यांच्या ताकदीमुळे मनोज जरांगे यांच्या पाठिशी महाराष्ट्रातील मराठा समाज एकटवला, ज्या गावात मनोज जरांगे यांनी ऐतिहासिक सभा घेऊन राज्याचे लक्ष वेधले, ज्या गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते शरद पवारांपासून राज ठाकरेंपर्यंतचे दिग्गज पोहोचले. त्याच अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनास विरोध केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Protected Content