
रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील निंभोरासिम गावाजवळील तापी नदीपात्रात एका अज्ञात तरुणीचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना २४ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली असून, ही हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास निंभोरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

पिंपरी नांदू पुलाजवळ तापी नदीत तरंगणारा मृतदेह स्थानिकांना दिसून आल्यानंतर त्यांनी तात्काळ निंभोरा पोलिसांना माहिती दिली. पोलीस नाईक सुरेश पवार यांनी दिलेल्या खबरनुसार, निंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. धुरखेडा येथील पोहणाऱ्या बेलदार समाजाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. नदीकाठावर मृतदेह आणल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
मृत महिला अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील असून, तिच्या अंगावर लाल आणि गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस आणि लेगीज होती. गळ्याभोवती घट्ट पांढऱ्या रंगाची ओढणी गुंडाळलेली होती, तसेच उजव्या मनगटावर व दोन्ही पायांवर दोरी बांधलेली होती. ही दोरी सिमेंटच्या पोलाशी घट्ट बांधलेली दिसून आली. मृतदेहाचे डोळे आणि जीभ बाहेर आलेली होती व शरीर कुजण्यास सुरुवात झाली होती. या बाबींवरून ही हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह नदीत फेकण्यात आल्याचा स्पष्ट संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळी रावेर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असून, शवविच्छेदन अहवाल अधिक तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रजिस्टर नंबर १३९/२०२५ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम १०३(१), २३८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सपोनी हरिदास बोचरे, फौजदार अभय ढाकणे, महिला फौजदार दीपाली पाटील व ममता तडवी यांच्या नेतृत्वाखाली केला जात आहे. तपासाचे काम जिल्हा पोलीस अप्पर अधीक्षक अशोक नखाते आणि चोपडा विभागीय पोलीस अधिकारी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सदर मृत महिला कोण आहे, ती कुठून आली, आणि तिचा खून कोणी व का केला याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून तपास अधिक गतिमान करण्यात आला आहे. नागरिकांना यासंदर्भात कोणतीही उपयुक्त माहिती असल्यास त्यांनी निंभोरा पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



