मुक्ताईनगरात युतीची माती : शिवसेना विरूध्द भाजपचा रंगणार जंगी सामना !

0
212


मुक्ताईनगर-पंकज कपले । आधी पाचोऱ्यात महायुतीतील दोन प्रमुख पक्ष अर्थात शिवसेना व भाजप एकमेकांच्या समोर ठाकले होते. आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुक्ताईनगरात देखील हेच दोन्ही पक्ष एकमेकांना तगडे आव्हान देणार असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक होत असल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. अन्य नगरपालिकांमध्ये धामधूम सुरू असतांना येथील दोन्ही प्रमुख राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवलेली असल्यामुळे सर्वांना मोठी उत्कंठा लागली होती. कालच आ. एकनाथराव खडसे यांनी भुसावळातील पत्रकार परिषदेत बोलतांना मुक्ताईनगरात राष्ट्रवादी अजित पवार गट शक्यतो निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. याचा अर्थ आज मुक्ताईनगरातील घटनांमधून उलगडल्याचे दिसून आले आहे.

आज आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर शहरातील प्रमुख समर्थकांनी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. यानंतर याच पदाधिकाऱ्यांना नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षाचे एबी फॉर्म देखील प्रदान करण्यात आले आहेत.

रक्षाताई खडसे यांनी ऐन वेळेस चक्रे फिरवून मुक्ताईनगरात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे केल्यामुळे येथे भाजप आणि शिवसेनेत जंगी सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दोन्ही पक्षांच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी नेमकी कुणाला उमेदवारी देण्यात येणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून येत्या काही तासांमध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे.