एकीकडे विचारांचे सीमोल्लंघन, तर दुसरीकडे भोजनभाऊंची गर्दी ! : शिवसेनेची टीका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दसर्‍याला झालेल्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्यांची तुलना करून शिवसेनेने आज एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

दसरा मेळाव्याला उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे दिसून आले. तर दोन्ही नेत्यांच्या भाषणातून एकमेकांवर टीका करण्यात आल्याचेही सर्वांनी पाहिले. शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील अग्रलेखात यावर आज भाष्य करण्यात आलेले आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की, शिवतीर्थावरील गर्दी भाडोत्री आणि पोटार्थी नव्हती हे एव्हाना तमाम महाराष्ट्राला समजले आहे; कारण सत्ता व पैसा या मुजोरपणावर शिवतीर्थ शिवसेनेस मिळू नये, दसरा मेळावा होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. ‘मिंधे’ गटाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बीकेसी मैदानावरील मेळाव्यात स्पष्टच सांगितले, ‘‘मी मनात आणले असते तर शिवाजी पार्क त्यांना मिळू दिले नसते.’’ ही धमकी समजावी की सत्तेची मस्ती? आणि हे म्हणे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार! नारायण राणे यांनीही अचंबित होऊन तोंडात बोटे घालावीत असे खोटे, दळभद्री आरोप आमच्यावर केले गेले. भाजपच्या गोटात गेलेल्यांना अशा ‘ओकाऱया’ काढाव्याच लागतात, नाहीतर त्यांना बैलांप्रमाणे ‘ईडी’कडून बडवले जाईल. नाव शिवसेनेचे आणि मेळावा भाजपचा असाच थाट होता. कारण ‘डुप्लिकेट’ शिवसेनेच्या मुख्य नेत्यांचे भाषण म्हणजे फक्त ‘मोदी-शहा चालिसा’चे वाचनच होते.

यात पुढे म्हटले आहे की, दोनेक हजार एसटी गाडया गर्दी मुंबईत आणण्यासाठी बुक झाल्या व त्याकामी १० कोटी रुपये रोख भरण्यात आले. हे रोख १० कोटी रुपये एसटी कर्मचारी तीनेक दिवस मोजत होते. आता हे रोखीतले १० कोटी मिंधे गटाच्या कोणत्या बँक खात्यातून आले? इतक्या कमी वेळात कोणी कोठे हात मारला? शिवाय दोन लाख लोकांना पंगत दिली गेली. बीकेसी मैदानामागे शाही जेवणाची पंगत असावी तसा सगळा लग्नथाट होता. येथे विचार-वारशाचा मेळावा(?) होता की ‘हाऊ डू मिंधे’, ‘नमस्ते मिंधे’सारखा उत्सव होता, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.

यात शेवटी नमूद केले आहे की, संजय राऊत हे शिवसेनेची भूमिका निष्ठीने व ठामपणे मांडत होते. त्यांची निष्ठा व भूमिका अडचणीची वाटू लागल्याने सत्ता व कायद्याचा गैरवापर करून राऊत यांना अटक करून तुरुंगात टाकले, हेच आता शिंदे यांनी कबूल केले. सत्ता डोक्यात जाते ती अशी. ती खूपच लवकर गेली, पण लोकांचे डोके ठिकाणावर आहे. त्यांनी दसर्‍याच्या दिवशी विचारांचेच सीमोल्लंघन केले. ‘बीकेसी’वर भोजनभाऊंची गर्दी झाली असेल तर तो खोकेवाल्यांचा प्रश्न! असे यात म्हटले आहे.

Protected Content