मुंबई प्रतिनिधी | विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढ्या सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न, असे म्हणत शिवसेनेने विरोधी पक्षांवर टीका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये आज युपीएला पर्याय म्हणून आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांवर भाष्य केले आहे. यात म्हटले आहे की, कॉंग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असं ऐतिहासिक विधान तृणमूल कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कुणालाच प्राप्त होत नाही. यूपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कुणाचा ते येणारा काळच ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा. कॉंग्रेस पक्षाची गेल्या दहा वर्षांतील घसरण चिंताजनक आहे याबाबत दुमत नाही. तरीही उताराला लागलेली ही गाडी पुन्हा वर चढूच द्यायची नाही व कॉंग्रेसची जागा आपण घ्यायची हे मनसुबे घातक आहेत, अशी भिती शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
यात पुढे म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच. पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढया सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न, असं देखील यात म्हटले आहे.
यात शेवटी म्हटले आहे की, २०२४ साली कुणाचे दैवे फळफळेल ते सांगता येत नाही. १९७८ साली जनता पक्षाच्या क्रांतिकारक विजयानंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर कधीच येणार नाहीत, असा जोश लोकांत होता. भाजपाचा जन्म कायम विरोधी बाकांवर बसण्यासाठी झालाय अशी टवाळकी पचवून हा पक्ष अवकाशात झेपावला. आज राहुल गांधी, प्रियांका गांधींची राजकीय कुचाळकी सुरू आहे. ते अशा कुचाळक्यांना तोंड देत संघर्ष करत आहेत. प्रियांका लखीमपूर खिरीत पोहोचल्या नसत्या, तर शेतकर्यांच्या खुनाचे प्रकरण रफादफा झाले असते. हेच विरोधकांचे काम आहे, असं या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.