‘एकच’ मारला पण सॉलीड मारला : शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई । राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला! हे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील अशा शब्दांमध्ये आज शिवसेनेने राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे यांच्यातील पत्रयुध्दावर आज शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनात भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये ते भगतसिंग कोश्यारी यांनी दाखवून दिले आहे. श्रीमान कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजपचे नेते असतीलही; पण आज ते महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचे राज्यपाल आहेत याचा त्यांना सोयीस्कररीत्या विसर पडलेला दिसतोय. महाराष्ट्रातील भाजप नेते रोज सकाळीच सरकारच्या बदनामीची मोहीम सुरू करतात हे समजण्यासारखे आहे; पण त्या मोहिमेचा चिखल राज्यपालांनी आपल्या अंगावर का उडवून घ्यावा? भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे; पण त्यांच्या दुखणाऱया पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही. हे दुखणं किमान पुढची चार वर्षे राहणारच आहे. पण भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर आहे. पण त्या बाळंतकळांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपचार केले आहेत. राज्यपाल पदावरील बुजुर्ग व्यक्तीने आपल्या मर्यादा सोडून वागले तर काय होते, त्याचा धडा देशातील सर्वच राज्यपालांनी घेतला असेल.

यात पुढे म्हटले आहे की, राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? असा सवाल राज्यपालांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले अशी भाषा आम्ही वापरणे असंसदीय ठरेल; पण मुख्यमंत्र्यांनी खास ठाकरी शैलीत राज्यपालांना खरमरीत उत्तर दिले आहे खरे. या प्रकरणात भाजप व त्यांनी नेमलेले राज्यपाल इतके उघडे पडले आहेत की श्रीकृष्णाने वस्त्रे पुरविली तरी त्यांची अब्रू वाचणार नाही.

यात नमूद केले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ङ्गएकचफ मारला, पण सॉलीड मारला! हे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील. बाकी जास्त काय बोलायचं? असे यात म्हटले आहे.

Protected Content