इंदिरांना वगळून देशाचाच नव्हे तर जगाचा इतिहास लिहता येणार नाही : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी | १९७१च्या युध्दाचा सुवर्ण महोत्सव साजरा करतांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेखही न करण्यात आल्याने शिवसेनेने यावर जोरदार टीका केली आहेे. इंदिरांना वगळून देशाचाच नव्हे तर जगाचा इतिहास लिहता येणार नसल्याचे सांगत शिवसेनेने यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

१६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेश युद्धात भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मृतीप्रीत्यर्थ दोन दिवसांपूर्वी देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले. हा विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी केंद्र सरकारकडून देखील कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मात्र, दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचं नाव देखील न घेतल्यावरून शिवसेनेने टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारला सुनावलं आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की, इंदिरा गांधींना वगळून देशाचाच नव्हे, तर जगाचा इतिहास कुणाला लिहिता येणार नाही. पण आपल्या देशातल्या खुज्या राज्यकर्त्यांना हे सांगणार कोण? इंदिरा गांधींनी धाडस दाखवलं नसतं, तर पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवताच आली नसती. हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेनं पाहाल, तर पाकिस्तानचे केले तसे तुकडे करू, असा संदेश इंदिरा गांधींनी जगाला दिला. त्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना सध्याच्या राज्यकर्त्यांनी इंदिरा गांधींचं साधं नावही घेऊ नये? त्यांचं नाव घ्यायला भय वाटतं की लाज वाटते? इंदिरा गांधींनी १९७१ चा पराक्रम केला, तेव्हा आजचे दिल्लीतले राज्यकर्ते कदाचित गोधडीत रांगत असतील, अशी टीका यात करण्यात आली आहे.

कॉंग्रेससोबत तुमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असू शकतात. तरीही देश घडवणार्‍या नेत्यांविषयी आकस ठेवणं हे सच्च्या हिंदुस्थानीचं लक्षण नाही. इंदिरा गांधींना श्रेय द्यायचं नाकारलं, तरी बांगलादेश युद्धाचा विजय त्यांच्याच नावावर नोंदवला जाईल. लहान मनाच्या राज्यकर्त्यांकडून देश महान कसा होणार? देशभक्ती दुर्मिळ झाली आणि बेईमानी बेछूट वावरू लागली, तर राष्ट्र हे राष्ट्र राहात नाही, असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे.

Protected Content