पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे शिवसेना फोडताय ! : शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत असा हल्लाबोल करत महाराष्ट्र लवकरच पेटून उठेल असा इशारा आज शिवसेनेने दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये आज बये दार उघड या शीर्षकाखाली अग्रलेख प्रसिध्द झाला असून यात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद मिळाले हे आता उघड झाले. जनता आणि शिवसैनिक आपल्या सोबत असल्याचा दावा हे लोक करीत असतील व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे आम्हीच असे ते बोलत असतील तर केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या वेढयात फिरण्याची गरज नाही; पण चोराच्या मनात चांदणे असा हा प्रकार असल्याची टीका यात करण्यात आलेली आहे.

यात पुढे म्हटले आहे की, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, राजेंद्र गावीत, संजय मंडलिक, धैर्यशील माने असे खासदार ‘हिंदुत्व’ वगैरे मुद्दयांवर बोलतात ते आश्चर्यच आहे. त्यांचे मूळ व कूळ शिवसेनेचे किंवा हिंदुत्वाचे नव्हतेच. शिवसेनेकडून विजयाची संधी असल्यानेच ते भगव्याचे तात्पुरते शिलेदार बनले. नाहीतर यांचे गोत्र कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीच आहे हे काय कुणाला माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षातही आता मूळच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा अशा बाहय जात-गोत्र-धर्मवाल्यांचा भरणा झाला आहे. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आज मूळ भाजपचे नाहीत, पण एखादे राज्य ताब्यात ठेवण्यासाठी, जिंकण्यासाठी कॉंग्रेस पक्षातून आलेल्या लोकांनाही भाजपने मुख्यमंत्रीपद दिले. केंद्रात पदे दिली. महाराष्ट्रात तरी वेगळे काय घडले? असा सवाल यात विचारलेला आहे.

यात शेवटी नमूद केले आहे की, महाराष्ट्राची सूत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झाली नव्हती. शिवसेना फोडणे व त्या फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे यातच मुख्यमंत्री शिंदे मश्गूल आहेत. महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकट आहेच, पण सुलतानी संकटाने राज्य जास्त बेजार आहे. पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत. नाथांनी त्या संकटात ‘बये दार उघड’ अशी आरोळी ठोकून महाराष्ट्राचे मन जागे केले होते. आजचा महाराष्ट्र तसा जागाच आहे. तो लवकरच पेटून उठेल असा इशारा यात देण्यात आलेला आहे.

Protected Content