मुंबई प्रतिनिधी । राज्यातील पडद्याआडच्या राजकीय घडामोडी गतीमान होत असतांना आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत शत्रूत्व नसल्याचे जाहीरपणे सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधार्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, कोणाच्या भेटगाठी झाल्या याबद्दल मला कल्पना नाही. अधिकृतपणे भाजपची शिवसेना किंवा कुठल्याही पक्षाशी भेटगाठ नाही. भारतीय जनता पक्ष हा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतो आहे. जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन विरोधी पक्ष म्हणून लढाई करण्याची आमची तयारी आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये शत्रुत्व कधीच नव्हतं. आमच्या वैचारिक मतभेद निर्माण झाले. कारण आमचा हात सोडून आमचे मित्र ज्यांच्याविरोधात निवडून आले त्यांचा हात पकडून निघून गेले. त्यामुळे मतभेद उभे झाले. आमच्यात कुठलेही शत्रूत्व नाही, मात्र राजकारणात जर-तरला महत्व नसते. वेळ आल्यास आम्ही योग्य निर्णय घेऊ असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, उद्यापासून सुरु होणार्या पावसाळी अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याचा आम्ही प्रयत्न करु असे फडणवीस म्हणाले. तसेच सभागृहात प्रश्न मांडू दिले नाही तर आम्ही रस्त्यावर जनतेचे प्रश्न मांडू असेही त्यांनी निक्षून सांगितले. तर विविध मुद्यांवरून त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.