शुभ बोल रे नार्‍या ! : शिवसेना व मनसेत जुंपली

मुंबई प्रतिनिधी । राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेवर शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी ‘शुभ बोल रे नार्‍या…’ या शब्दात राज ठाकरेंवर टीका केली आहे. यामुळे आता या मुद्यावरून शिवसेना व मनसेमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.

एबीपी-माझा या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. हे सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही, कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये. हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, हे आधीपासून बोलतोय, माझी इच्छा नाही हे सरकार पडावं पण तीन पक्षाचं सरकार आहे, एकमेकांना विचारलं जात नाही, त्यामुळे हे टिकेल वाटत नाही, सरकारमधील पक्षांमध्ये विसंवाद आहे हे प्रखरतेने दिसून येते असं राज ठाकरे म्हणाले होते.

राज ठाकरे यांच्या टिकेला त्यावर मंत्री सुभाष देसाई यांनी जोरदार उत्तर दिले. याबाबत प्रतिक्रिया देतांना देसाई म्हणाले की, शुभ बोल रे नार्‍या एवढचं मी म्हणेन, सरकार चांगले काम करत आहे, त्यावर चांगले बोललं पाहिजे, सरकार जनतेच्या पाठिशी उभं आहे. आमच्या चुका नक्कीच दाखवल्या पाहिजे, त्यातील कमतरता भरुन काढू, पण चांगल्या कामाचंही कौतुक करावं असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्योगांना चालना देण्यासाठी चांगल्या सुविधा द्यायला सुरु केल्या आहेत, एमआयडीसीने उद्योजकांना तयार शेड देण्याची तयारी दाखवली आहे. नवीन गुंतवणूकदारांना उद्योगमित्र उपलब्ध करुन देणार आहोत. महापरवाना योजना सुरु केली आहे अशी माहितीही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

Protected Content