युतीच्या कसरतीत दोन्ही पक्षांच्या समर्थकांची गोची !

पाचोरा गणेश शिंदे । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने रणशिंग फुंकल्याचे संकेत देतांनाच युतीबाबतचा सस्पेन्स शिगेला पोहचला आहे. आजची स्थिती पाहता युती झाली अथवा नाही झाली तरी दोन्ही स्थितींमध्ये भाजप व शिवसेना समर्थकांची गोची होणार असल्याचे दिसून येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असतांना युती होणार की नाही ? हा आजचा लाखमोलाचा प्रश्‍न आहे. वरिष्ठ पातळीवरून याबाबतचा संभ्रम कायम असतांनाच दुसरीकडे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील खूप बुचकळ्यात पडले आहेत. यातच शिवसेना पक्षप्रमुख १५ फेब्रुवारी रोजी पाचोरा येथूनच लोकसभा निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा करणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे तर या गोंधळात अजूनच भर पडली आहे.

गत विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यामुळे या दोन्ही पक्षांमधील नेते, पदाधिकारी आणि कार्यर्त्यांची मने दुभंगली आहेत. गत सुमारे २५ वर्षांपासून एकदिलाने काम करणार्‍या या दोन्ही पक्षांमधील सलोखा एका क्षणात संपुष्टात आला. विधानसभेच्या निकालानंतर भाजपने सातत्याने सभागृहात आणि सभागृहाबाहेर शिवसेनेला सापत्नपणाची वागणूक दिली आहे. यामुळे वरिष्ठ नेत्यांपासून ते अगदी गाव पातळीपर्यंत युतीमध्ये प्रचंड धुम्मस सुरू आहे. भाजपच्या अरेरावीला वेसण घालण्यासाठी युती करू नये अशी बहुतेक पदाधिकार्‍यांची मागणी आहे. तथापि, युती न झाल्यास निवडणुकीत मोठा फटका बसेल म्हणून दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. एकीकडे वरिष्ठ पातळीवरून या हालचाली सुरू असतांना जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली आहे. यातच गत अनेक महिन्यांपासून माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी मतदारसंघात संपर्क यंत्रणा सुरू केल्यामुळे ते मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अगदी आतादेखील त्यांनी युती झाली वा नाही झाली तरी लढण्याचा निर्धार केला आहे. मात्र युती न झाल्यास आर.ओ. पाटील यांचे मैदानात उतरणे इतके सहजशक्य नाही. तर युती झाल्यास शिवसेनेचे कार्यकर्ते हे भाजपला खुल्या दिलाने मदत करतील का? याबाबत आज सांगणे अवघड आहे. म्हणजे एक वेळ युती न झाल्यास किमान उघड-उघड एकमेकांशी टक्कर तरी घेता येईल. मात्र युती झाल्यास भाजपच्या उमेदवाराला धडा शिकवण्याची नामी संधी शिवसेनेला मिळू शकते. आणि आजवरच्या अपमानांनी दुखावलेले नेते आणि पदाधिकारी ही संधी घालवतील असे वाटत नाही.

जळगाव महानगरात अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि सेना आमने-सामने ठाकले होते. तेथे अजूनही दोन्ही पक्षांमध्ये तीव्र संघर्ष आहे. हीच स्थिती जळगाव ग्रामीण, पाचोरा-भडगाव, एरंडोल-पारोळा, अमळनेर आदी मतदारसंघांमध्ये आहे. यामुळे युती झाल्यास नाईलाजास्तव शिवसेना व भाजपचे नेते एकमेकांसोबत फिरतील. मात्र आजवरचा हिशोब हा ऐन मतदानाच्या वेळेस काढतील अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात सद्यस्थितीत विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांना तिकिट मिळणार की नाही? अशी चर्चा आहे. जर तिकिट मिळाले तरी शिवसेनेचे नेते पाठीमागून मदत करतील का? हा प्रश्‍न आहे. यामुळे युतीची कसरत सुरू असतांना दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यर्त्यांची गोची झाल्याचे दिसून येत आहे.

Add Comment

Protected Content