Home क्राईम शिवरे ग्रामसेवक मृत्यू प्रकरणाला गंभीर वळण ; सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा,...

शिवरे ग्रामसेवक मृत्यू प्रकरणाला गंभीर वळण ; सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, दोघांना अटक

0
11

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकाला झालेल्या धक्काबुक्की आणि गोंधळानंतर उपचारादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. ग्रामसेवक प्रल्हाद नारायण पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून पारोळा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरच कुटुंबीयांनी ग्रामसेवकाचा मृतदेह ताब्यात घेतला.

प्रल्हाद नारायण पाटील हे गेल्या सहा महिन्यांपासून शिवरे ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कर्तव्य बजावत होते. १७ ऑगस्ट रोजी ग्रामसभेदरम्यान काही तरुणांनी गोंधळ घालत त्यांना घेराव घातल्याचा आरोप आहे. यावेळी धक्काबुक्की करण्यात आली तसेच त्यांच्यामागे काही जण धावत गेल्याने त्यांचा रक्तदाब वाढला. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर ग्रामसेवक संघटना, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, सरपंच परिषद संघटना, ग्राम रोजगार सेवक संघटना यांच्यासह विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामसेवकाच्या मृत्यूची केवळ आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद न करता संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनांनी केली. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे दोन वाजता पारोळा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतरच ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचा मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. दुपारी सुमारे ११ वाजता पारोळा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रकरणी प्रल्हाद पाटील यांचे भाऊ सुनील नारायण पाटील (वय ५२, व्यवसाय शेती, रा. बोदर्डे, ता. पारोळा) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ग्रामसभेदरम्यान प्रल्हाद पाटील यांनी आपल्या हृदयविकाराच्या आजाराबाबत उपस्थितांना माहिती दिली होती. मात्र, यानंतरही काही जण वारंवार मध्ये उभे राहून गोंधळ घालत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, शाम प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर अशोक पाटील आणि राहुल वाल्मीक पाटील यांनी प्रल्हाद पाटील यांना पकडून जबरदस्तीने खुर्चीवर बसविले. तसेच शाम पाटील याने त्यांच्या छातीत जोरात बुक्का मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधितांनी त्यांच्या आजाराची कोणतीही काळजी न घेता गोंधळ घालत त्यांच्या मागे धावल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात शाम प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर अशोक पाटील, राहुल वाल्मीक पाटील, गोरख सयाजी पाटील, ज्ञानेश्वर बापू पाटील आणि भूषण सरदार, सर्व रा. शिवरे दिगर, ता. पारोळा, यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींच्या भूमिकेबाबत तपास सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत. ग्रामसेवकाच्या मृत्यूमुळे शिवरे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांकडून होत आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासातून नेमकी घटना, आरोपींची भूमिका आणि मृत्यूशी संबंधित परिस्थिती स्पष्ट होणार आहे.


Protected Content

Play sound