राम मंदिराच्या विषयात शिवसेना अदखलपात्र ! : शेलारांचा आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राम मंदिर आंदोलनात उध्दव ठाकरे आणि त्यांचे सहकारी कुठे होते ? अशी विचारणा करतांनाच या विषयात शिवसेना अदखलपात्र असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशीष शेलार यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पतनात शिवसेनेचा काडीचाही सहभाग नसल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळातील वातावरण तापले असून शिवसेनेच्या नेत्यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आता याच मुद्यावरून भाजप नेते आमदार आशीष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला डिवचले आहे. शेलार म्हणाले की, राम मंदिर आणि बाबरी प्रकरणी कोण कुठे होता या शर्यतीत उतरायचे असेल तर त्यावेळी तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुठे होते? हे संजय राऊतांनी सांगावे. मनोहर जोशी, लिलाधर डाके कुठे होते? ते ढाचा तुटला तेव्हा कुठे होते? ढाचा तुटल्यावर ते कसे पोहचले? त्यांचे विमान कुठे भरकटले होते? ज्यावेळी विटांचे पूजन केले तेव्हा स्वतः राऊत तुम्ही कुठे होतात?, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला. शिवसेना राममंदिर या विषयात अदखलपत्र आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आशिष शेलार पुढे म्हणाले की, शिवसेनेने कल्याण सिंह यांच्याकडे कुटुंबीयांकडून ट्युशन लावा. त्यांनी धर्मासाठी सत्ता सोडली. तुम्ही धर्म सोडून सत्तेला चिटकून बसला आहात. ही बेडूक उड्या मारणारी शिवसेना आहे. शिवसेनेचा आजचा कार्यक्रम आयत्या बिळावर नागोबा असा आहे. हिंदुत्वावरून तुम्ही फाटके आहात का? इतरांचे फाटके दाखवताय मग शिवसेना हे फाटकं बनियान आहे असे तुम्हाला आम्ही म्हणायचे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात राज ठाकरे सुपारी घेऊन बोलत होते हे अजित दादांनी मान्य केले आहे. मग त्यांनी आता सुपारीची किंमत सांगावी, असं आव्हान देतानाच राज्य सरकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या इशारावर चालते. या सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्या हाती आहे, असा टोला देखील त्यांनी मारला.

Protected Content