शिवसेनेचा निर्धार मेळावा उत्साहात ; स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भगवा फडकवण्याचा निर्धार


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जळगाव तालुक्यातील निर्धार मेळाव्याला प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवसेना जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या या मेळाव्यात शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून शिवसेनेचा भगवा फडकवण्याची शपथ घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सक्षम पर्याय देण्याचा ठाम निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.

या निर्धार मेळाव्यात शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख कुलभूषण भाऊ पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश भाऊ चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश आबा पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे आणि तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.

मेळाव्यात अनेक इच्छुक उमेदवारांनी आगामी निवडणुकांसाठी अर्ज दाखल केले. कानळदा भोकर गटातून सौ. दिपाली भाऊसाहेब सोनवणे यांनी जिल्हा परिषदेसाठी फॉर्म भरला, तर पंचायत समिती गणांसाठी सौ. मीराबाई गंगाधर घुगे (कुसुंबा खुर्द), ॲड. विशाल तुकाराम सोनवणे (विदगाव), योगेश नथू चौधरी, हनीफ मुशीर शेख, सुनील दगडू धनगर (म्हसावद), धणराज चराटे (म्हसावद बोरणार), सौ. लताबाई सिताराम सपकाळे आणि छाया गुलाबराव कांबळे (कानळदा), तसेच राकेश घुगे (चिंचोली) यांनी आपली निवडणूक तयारी जाहीर केली.

या मेळाव्यात मागासवर्गीय सेनेचे उपजिल्हाप्रमुख गुलाबराव कांबळे, जिल्हा उपसंघटक योगेश चौधरी, युवासेना तालुका प्रमुख किरण पवार, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख इमाम पिंजारी, तालुका समन्वयक भगवान धनगर, तालुका संघटक विशाल सोनवणे, तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांनी “शिवसेनेचा भगवा पुन्हा झळकणार” अशी घोषणा देत आगामी निवडणुकीसाठी आपला लढाऊ निर्धार व्यक्त केला.

या मेळाव्याने जळगाव तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून, येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचे बळ ठळकपणे दिसून येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.