शिवसेनेच्या मुस्लिम नगराध्यक्षांची छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या संकल्पनेतुन धरणगाव नगर परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य तैलचित्र लावण्यात आले आहे. चित्रकार शिवाजी सुतार यांनी हे चित्र रेखाटले असुन मुस्लिम नगराध्यक्षांनी शिवरायांना दिलेली ही मानवंदना असल्याची भावना सहकार राज्यमंत्री ना गुलाबराव पाटील व ग्रामविकास राज्यमंत्री ना दादा भुसे यांच्यासह मान्यवर व नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सलीम पटेल शिवसेनेचे उपनेते तथा राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तालमीत तयार झालेले धरणगाव येथील पहिल्या फळीतील शिवसैनिक. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणुन प्रदीर्घ काळ ते कार्यरत आहेत. २०१७ मध्ये झालेल्या नगर परिषद निवडणुकीत सलीम पटेल हे थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणुन विजयी झाले आणि 30 हजार हिंदु व 6 हजार मुस्लिम मतदार असलेल्या धरणगावकरानी व शिवसेनेने जाती – भेदाच्या भिंती गाडून ” राष्ट्रीय एकात्मतेचा ” नवा मापदंड निर्माण केला.

शिवसेना उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम पटेल यांनी नेहमीच लोकहितार्थ व सामाजिक कामे करून वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे विचार सत्यात उतरवले आहेत. गंभीर आजारपणामुळे नगराध्यक्ष पटेल हे मागिल काही महिन्यापासुन विश्रांती घेत आहेत. मात्र, नगर पालिका इमारतीत छत्रपती शिवरायांचे भव्य तैलचित्र लावण्याची संकल्पना त्यांनी मांडली. जिल्ह्यातील नामांकित चित्रकार शिवाजी सुतार यांच्यकडुन हे तैलचित्र बनवून घेण्यात आले आहे.

धरणगाव येथे 28 जानेवारी रोजी झालेल्या विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवराय हे सुरतच्या स्वारी ला जाताना धरणगावला येवून गेल्याचा इतिहास आहे. या इतिहासाचे स्मरण ठेवून शिवरायांचे तैलचित्र नगर पालिकेत लावण्याचे कार्य शिवसेनेने केले आहे. दरम्यान,जिल्ह्यातील नामांकित चित्रकार शिवाजी सुतार यांनी काढलेल्या छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर , ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, ना गुलाबराव पाटील व इतर सर्व मान्यवरांनी तोंडभरून कौतुक केले.

Add Comment

Protected Content