धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाविरोधात आज धरणगाव शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात सायंकाळी ६ वाजता झालेल्या या आंदोलनात शासनाच्या हिंदी सक्तीच्या जीआरची (शासन निर्णय) होळी करण्यात आली.
शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला. ‘मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती सहन केली जाणार नाही,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी बोलताना गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, “मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि तिचे महत्त्व अबाधित राखणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदीला आम्ही विरोध करत नाही, पण पहिलीपासून ती सक्तीची करणे हे मराठी भाषेच्या अस्तित्वावर गदा आणण्यासारखे आहे. हा निर्णय म्हणजे मराठी अस्मितेवरचा हल्ला आहे.” मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मराठीप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. हिंदी सक्तीचा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास यापुढेही तीव्र आंदोलने छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.