जळगाव प्रतिनिधी । अभिनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला असून याबाबत तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार शिवसेनेचे माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे यांनी पोलीस स्थानकात दिली आहे.
गजानन मालपुरे यांनी आज जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. यात कंगना राणावत हिने अनेकदा महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचे नमूद केले आहे. यात तिचे आजवरचे अनेक वक्तव्ये, वेळोवेळी केलेले ट्विटस यांचा संदर्भ देण्यात आला आहे. कंगनाने वेळोवेळी महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्याचा व यातील जनतेचा अपमान केला आहे. तसेच तिच्या वक्तव्याने दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाली असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. कंगनाने ड्रगबाबत गौप्यस्फोट केले असले तरी तिने याबाबतच्या चौकशीला तयारी दर्शविलेली नाही. यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या तक्रार अर्जात करण्यात आली आहे.