


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पत्रकारांना केलेल्या कथित शिवीगाळीच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मुक्ताईनगर यांना निवेदन देऊन खासदार संजय दीना पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविला. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा अपमान करणारी ही घटना संतापजनक व निंदनीय असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे समाजाचे डोळे आणि कान असतात. समाजातील सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार प्रामाणिकपणे पार पाडत असतात. अशा पत्रकारांबाबत अर्वाच्य भाषा वापरणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारची असंसदीय भाषा अपेक्षित नसल्याचे सांगत, या घटनेबाबत शासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. पत्रकारांचा सन्मान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करणे ही लोकशाही व्यवस्थेची जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन बळीराम गोसावी, तालुका प्रमुख ॲड. राहुल पाटील, तालुका समन्वयक ॲड. देवेंद्र बोदडे, तालुका संघटक वसीम पिंजारी, ॲड. अशोक बोदडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मुक्ताईनगर यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन सादर करत पत्रकारांच्या सन्मानाचे रक्षण करण्याची आणि संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.



