


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जेष्ठ मासाच्या सांगतेनिमित्त मन्यारखेडा येथील श्री बदरीनाथ मंदिर संस्थान, जळगाव येथे भव्य महाअभिषेक सोहळा भक्तिभावात संपन्न झाला. विश्वातील एकमेव ग्रह, राशी आणि नक्षत्र मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात जेष्ठ पौर्णिमेच्या पावन पर्वावर भगवान नारायणाचा विशेष अभिषेक करण्यात आला.
जेष्ठ महिन्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर धार्मिक परंपरेनुसार भगवान विष्णूला शीतल जलाने स्नान घालण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. याच भावनेतून थंड माठाच्या पाण्याने भगवान बदरीनाथाचा अभिषेक करण्यात आला. “आपो नारायणः साक्षात्” म्हणजे पाणी हे साक्षात नारायणाचे स्वरूप आहे, या श्रद्धेनुसार हा महाअभिषेक विधी पार पडला.
या विशेष अभिषेकासाठी ३० प्रकारच्या विविध औषधी वनस्पतींच्या पाण्याचा वापर करण्यात आला. यामुळे धार्मिक विधीसोबतच निसर्गातील औषधी गुणांचे महत्त्वही अधोरेखित झाले. अभिषेकासाठी मागील दिवशी सर्व तीर्थकुंडांमधून पवित्र जल भक्तांनी आणले होते. या पवित्र जलाने भरलेल्या कलशांची जलयात्राही भक्तिभावाने काढण्यात आली. महाअभिषेक सोहळ्यानंतर भगवान बदरीनाथाची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे गादीपती श्री मयूरगोविंदजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचन दिले. त्यांनी धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्याला परिसरातील तसेच विविध भागांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.



